रोहित्र जळाल्याने येरोळ अर्धे गाव अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:03 AM2021-01-08T05:03:07+5:302021-01-08T05:03:07+5:30
येरोळ : येरोळ येथील रोहित्र जळाल्याने आठ दिवसांपासून अर्धे गाव अंधारात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असून, महावितरणचे ...
येरोळ : येरोळ येथील रोहित्र जळाल्याने आठ दिवसांपासून अर्धे गाव अंधारात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असून, महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीतील हरभरा, गहू, ज्वारीचा पेरा केला आहे तसेच भाजीपाल्याचे उत्पादनही घेतले जात आहे. सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना गावातील रोहित्र जळाल्याने अर्धे गाव अंधारात आहे. तसेच विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल पंपाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
गावातील महादेव मंदिराजवळील व अन्य एका ठिकाणचे रोहित्र आठ दिवसांपूर्वी जळले. हे रोहित्र लवकर बदलून मिळावे, अशी मागणी ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, अद्यापही नवीन रोहित्र का बसविण्यात आले नाही, असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
शेतकऱ्यांची अडचण...
यंदा रब्बी हंगामातून चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. विहिरीत पाणी आहे. परंतु, रोहित्र जळाल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतातील पिके सुकू लागली आहेत. महावितरणने तत्काळ नवीन रोहित्र बसवावे, अशी मागणी येथील शेतकरी शिवानंद भुसारे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.