अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देणे पालकांच्या अंगलट; २० जणांना प्रत्येकी १० हजारांचा दंड
By आशपाक पठाण | Published: July 22, 2023 04:38 PM2023-07-22T16:38:03+5:302023-07-22T16:38:35+5:30
लातूर शहराचा वाढता विस्तार, शैक्षणिक शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या शहरात अपघाताची संख्याही वाढू लागली आहे.
लातूर : पालकांनो सावधान, अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी द्याल तर. रस्त्यावर वाहन चालवित असताना आढळून आल्यास तुम्हाला शंभर दोनशे नव्हे तर तब्बल १० हजारांचा दंड भरावा लागणार आहे. सज्ञान नसलेली ही मुले भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच लातूर शहरात आरटीओच्या पथकाने अचानक तपासणी करून २० जणांना प्रत्येकी १० हजारांचा दंड दिला. एवढेच नव्हे तर त्यांच्या पालकांना कार्यालयात बोलावून त्यांचीही हजेरी घेण्यात आली आहे.
लातूर शहराचा वाढता विस्तार, शैक्षणिक शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या शहरात अपघाताची संख्याही वाढू लागली आहे. अपघातात सर्वाधिक अपघात दुचाकीचे. त्यात पुन्हा अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आढळून आल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने अचानक तपासणी मोहिम घेतली. वेगवेगळ्या चार मार्गांवर पथकाने अल्पवयीन मुलांची वाहने तपासली. यात ४० वाहने पकडण्यात आली. यातील २० जणांच्या पालकांना प्रत्येकी १० हजारांचा दंड आकारण्यात आला. शाळा, महाविद्यालयात दुचाकीवर जाणाऱ्या मुलांना समज देण्यात आली आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना अडवून वाहन तपासणी केली जात आहे.
पालकांनो मुलांना दुचाकी देऊ नका...
अल्पवयीन मुले वाहन चालवित असताना नियमांकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा मित्रांसाेबत स्पर्धा लावतात. रस्त्याने जाताना घोळक्याने जाण्याचा प्रयत्न करतात. यातून अपघाताचा धोका वाढतो, असे असले तरी लातूर शहरात अनेक अल्पवयीन मुले बिनधास्तपणे वाहने चालवित असल्याचे दिसून येतात. यामुळे अपघात होत आहेत. अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी ही मोहिम परिवहन आयुक्तांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आली आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना दुचाकी देऊ नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी केले आहे.
सहा महिन्यात ११३ अपघात, ९२ मृत्यू
जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात ११३ दखलपात्र अपघात झाले आहेत. यात तब्बल ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. एकुण अपघातात ७० टक्के अपघात दुचाकीचे असून मयतात दुचाकीवरील प्रवशांचे प्रमाणत अधिक आहे. अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोहिम सुरू करण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालयांना सूचना...
शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्गांना प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने सूचना करण्यात आल्या आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांना दुचाकी घेऊन येण्यास बंदी घालावी. अपघात रोखण्यासाठी हा प्रयत्न असून पालकांनीही गांभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी सांगितले.
वाहन तपासणीला ४ पथके...
प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शहरात चार पथकामार्फत केवळ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई मोहिम राबविण्यात आली. यात ४० जण आढळून आले. यातील २० जणांना प्रत्येकी १० हजारांचा दंड देण्यात आला आहे. या पथकामार्फत अचानक तपासणी मोहिम राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दंडाबरोबर पालकांनाही दिले धडे...
दुचाकी चालवित असताना आढळून आलेल्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना दंड तर देण्याात आलाच. पण त्यांना आरटीओ कार्यालयात बोलावून वाढते अपघात, वाहन चालविण्याचे नियम, दंडाची तरतूद आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे आरटीओत फेरे मारायची नसतील तर अल्पवयीन मुलांना दुचाकी न देणे आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.