बोढार, रेणापूर येथील हत्याप्रकरणी आरोपीला फाशी द्या; लातुरात रिपाइं आठवले गटाची निदर्शने
By राजकुमार जोंधळे | Published: June 8, 2023 06:03 PM2023-06-08T18:03:57+5:302023-06-08T18:04:36+5:30
नांदेड आणि लातूर जिल्ह्यात जातीय मानसिकतेतून दोघा दलित तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली असून, या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत.
लातूर : नांदेड जिल्ह्यातील बोढार-हवेली येथील अक्षय भालेराव या तरुणाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केल्याने तर आणि लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील गिरीधारी तपघाले यांची तीन हजारासाठी निर्घृण हत्या करण्यात आली असून, या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) लातूर शाखेच्या वतीने लातुरातील गांधी चौकात गुरुवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र राज्य सचिव चंद्रकांत चिकटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
नांदेड आणि लातूर जिल्ह्यात जातीय मानसिकतेतून दोघा दलित तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली असून, या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. या हत्या प्रकरणाची सीबीआयच्या वतीने कसून चौकशी करण्यात यावी, दोन्ही खटले जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात यावेत, यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावेत, दोन्ही पीडित कुटुंबाना शासनाने संरक्षण द्यावे, जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यात यावी, दोषी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करून, फासावर लटकवावे आदी मागण्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केल्या आहेत.
निवेदनावर चंद्रकांत चिकटे, अशोकराव कांबळे, डॉ. सुधाकर गुळवे, अंकुश धैर्य, अड. अतिष चिकटे, रामराव गवळी, शरद चक्रे, विलास वाघमारे, महादू गायकवाड, महादू साळवे, समाधान वाघमारे, राजेंद्र लोदगेकर, धम्मानंद घोडके, भरती लामतुरे, डी. एस. नरसिंगे, सुनील कांबळे, अनंत धावरे, नितीन कदम,कपिल गायकवाड, आकाश ससाणे, धम्मपाल सोनकांबळे, वैभव गायकवाड, कार्तिक गायकवाड, अजय चक्रे, महेश वाघमारे, अरुण सूर्यवंशी, मनोज गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तपघाले कुटूंबाला २५ हजारांची मदत...
रेणापूर तालुक्यातील गिरीधारी तपघाले यांच्या कुटूंबाला रिपाइं आठवले गटाच्या वतीने २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.