पैसे जमा झाल्याच्या एसएमएसने आनंद मात्र बँकेत गेल्यानंतर बसला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 05:43 PM2018-12-22T17:43:44+5:302018-12-22T17:47:03+5:30
खात्यावर टाकलेले पैसे चुकून आल्याने ते परत घेतल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
लातूर : ५० हजार, लाख, सव्वालाख अशी रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचा बँकेचा एसएमएस आला. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद निर्माण झाला. काही शेतकऱ्यांनी बँकेत तात्काळ चौकशी केल्यानंतर पैसे जमा झाल्याचे समजले. परंतु, आठ दिवसांनी पैसे काढण्यासाठी गेलेल्या या शेतकऱ्यांना धक्काच बसला. पीकविमा कंपनीने खात्यावर टाकलेले पैसे चुकून आल्याने ते परत घेतल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
डिसेंबर महिना उलटत आला असतानाही गेल्या वर्षीच्या हंगामातील प्रधानमंत्री पीकविम्याचा घोळ संपुष्टात आला नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी खरिपाचा पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अडीचशे कोटी रुपये मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात जूनपासून वाटपास सुरुवात झाल्यानंतर शंभर कोटींची तफावत झाली. पहिल्या टप्प्यात २ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना १३४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात १ लाख ७६ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटी, तिसऱ्या टप्प्यात २ लाख १० हजार शेतकऱ्यांना ३९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. तरीही काही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिल्याचे पाहून ‘लोकमत’ ने वारंवार वृत्त प्रकाशित केल्याने आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर गत नोव्हेंबरच्या सुरुवातीस चौथ्या टप्प्यात २१ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्याचे वितरण सुरु झाले.
दरम्यान, पीकविमा कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नव्हता अशा जळकोट, रेणापूर, लातूर आणि औसा तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या नावावरही पीकविम्याची रक्कम टाकण्यात आली. ही रक्कम सदरील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली. त्याचे एसएमएस शेतकऱ्यांना आले. अचानपकपणे पैसे कशाचे आले याची उत्सुकता शेतकऱ्यांत निर्माण झाली तर काही शेतकऱ्यांनी खरोखरच पैसे जमा झाले का? याची बँकेत जाऊन खात्री करुन घेतली. तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी पैसे जमा झाल्याचे सांगितले.
आठवडाभराचा कालावधी उलटताच हे पैसे काढण्यासाठी सदरील शेतकरी गेले असता विमा कंपनीने पुन्हा पैसे परत घेतले असल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या शेतकऱ्यांची निराशाच झाली. मात्र, आपण गेल्या वर्षी पीकविमाच भरला नव्हता. त्यामुळे आपल्याला विम्याची रक्कम कशी मिळणार? असा स्वत:शीच सवाल करीत हे शेतकरी परतले.
चार तालुक्यांत घडला प्रकार
गतवर्षीच्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरही चुकून रक्कम जमा झाली होती़. जळकोट, रेणापूर, लातूर आणि औसा तालुक्यातील काही भागांत हा प्रकार घडला. ही रक्कम कंपनीने परत घेतली असल्याचे नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक विजय पस्तापूरे यांनी सांगितले.