दिवाळीपूर्वीच शिक्षकांच्या चेहऱ्यांवर आनंद; ५४ जणांना लागली पदोन्नतीची लॉटरी
By संदीप शिंदे | Published: November 2, 2023 06:14 PM2023-11-02T18:14:37+5:302023-11-02T18:15:45+5:30
लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बढतीस पात्र शिक्षकांची गर्दी
लातूर : जिल्हा परिषदेतंर्गत असलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांना पदोन्नतीची प्रतीक्षा लागली होती. अखेर गुरुवारी समुपदेशन पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली. यात एकूण ५४ जणांची बढती झाली आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गुरुवारी सकाळपासून शिक्षकांची गर्दी होती. मागील काही दिवसांपासून मुख्याध्यापक, शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा होती. त्यानुसार शिक्षण विभागाने दिवाळीपूर्वीच या शिक्षकांची पदोन्नती जाहीर केली आहे. यामध्ये अराजपत्रित मुख्याध्यापक वर्ग तीन पदावर १, शिक्षण विस्तार अधिकारी पदावर ५ आणि मुख्याध्यापक पदावर ४८ शिक्षकांना पदाेन्नती दिली आहे. मुख्याध्यापक वर्ग ३ मध्ये १ अस्थिव्यंग, १ अल्पदृष्टी आणि ४६ सर्वसाधारण शिक्षकांचा समावेश आहे. समुपदेशनाने ही पदोन्नती झाल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमाेल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया राबविली.
जिल्ह्याची बिंदू नामावली प्रमाणित...
लातूर जिल्ह्याची बिंदूनामावली प्रमाणित झाली असून, सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. लवकरच पात्रता धारकांना पदवीधर दर्जावाढ देण्यात येणार असून, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, वरीष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी आदी प्रक्रिया दिवाळीनंतर पुर्ण करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी सांगितले.
शिक्षक संघटनांकडून पदाधिकाऱ्यांचा सत्कार...
विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक पदासाठी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती प्रक्रिया पार पडली. यासाठी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेतला. त्याबद्दल शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशव गंभीरे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मोहन हाके, जुनी पेन्शन योजना संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी, राहूल मोरे, गौतम टाकळीकर, किशोर माने, विजयसिंह मोरे, महादेव सोनवणे आदींसह शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.