काहींच्या चेहऱ्यावर आनंद तर कोणी नाराज! बदल्यांमुळे जिल्हा परिषदेत तोबा गर्दी
By हरी मोकाशे | Published: May 18, 2023 07:32 PM2023-05-18T19:32:22+5:302023-05-18T19:32:30+5:30
एकूण ९६ जणांच्या बदल्या...
लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गतच्या तीन विभागातील कर्मचाऱ्यांची गुरुवारी बदली प्रक्रिया समुपदेशनाने पार पडली. त्यामुळे जिल्हा परिषदेत तोबा गर्दी झाली होती. दरम्यान, काहींना अपेक्षेप्रमाणे ठिकाण मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता तर काहींची अपेक्षित ठिकाणी बदली न झाल्याने नाराजी दिसून येत होती.
जिल्हा परिषदेच्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी सभागृहात समुपदेशन पध्दतीने बदली प्रक्रिया पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांची उपस्थिती होती. गुरुवारी सामान्य प्रशासन, पंचायत आणि शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांच्या बदल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेत दिवसभर बदलीसाठी उत्सुक असलेल्यांनी गर्दी केली होती.
जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंतीवरुन बदल्या सुरु आहेत. सोमवारी कृषी व पशुसंवर्धन, बांधकाम, लघुपाटबंधारे, महिला व बालकल्याण आणि अर्थ विभागातील एकूण २९ जणांच्या बदल्या झाल्या होत्या.
एकूण ९६ जणांच्या बदल्या...
गुरुवारी एकूण ९६ जणांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात प्रशासकीय ७३ तर विनंतीवरुन २३ बदल्या झाल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी ४, कनिष्ठ प्रशासन अधिकारी- ४, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)- १, वरिष्ठ सहाय्यक- २, कनिष्ठ सहाय्यक- १९, पंचायत विभागाअंतर्गतचे ग्रामसेवक- ५१, ग्रामविकास अधिकारी- १०, विस्तार अधिकारी- २, शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख- ३ अशा बदल्या झाल्या आहेत.
समुपदेशानाने दिले ठिकाण...
गुरुवारी प्रशासकीय आणि विनंती अशा एकूण ९६ बदल्या झाल्या आहेत. सर्व बदल्या ह्या नियमाप्रमाणे आणि समुपदेशनाने पार पडल्या आहेत. तात्काळ पदस्थापनेचे आदेश देण्यात येतील.- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.