हर घर तिरंगा मोहिम : लातूर जिल्ह्यात प्रशासनाकडून २ लाख ८० हजार राष्ट्रध्वजाचे वितरण
By संदीप शिंदे | Published: August 8, 2022 06:39 PM2022-08-08T18:39:12+5:302022-08-08T18:39:45+5:30
१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येणार आहे
लातूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ८ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासनाच्या वतीने २ लाख ८० हजार १६१ राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले असल्याचे अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले.
अपर जिल्हाधिकारी लोखंडे म्हणाले, जिल्ह्यात ५ लाख ९ हजार ६९६ कुटूंब संख्या आहे. त्यानुसार २ लाख ८० हजार ध्वजाचे वितरण केले आहे. उर्वरित २ लाख २९ हजार ५३५ ध्वजाचे नियोजन करण्यात येत असून, राज्य शासनाकडून एक लाख ध्वज मिळणार आहेत. हर घर तिरंगा मोहिमेसाठी आरोग्य विभागाला २९८, शिक्षण विभाग २५९४, महिला व बालकल्याण विभाग २७२१, समाजकल्याण विभाग १५९, पशुसंवर्धन विभाग १२२, पंचायत विभाग ७८६ तर इतर विभागांना ५८५ असे एकूण ७ हजार २६५ ध्वज वितरीत करण्यात आले आहेत.
तसेच स्वराज्य महोत्सवातंर्गत ८ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविले जाणार असून, ग्रामसभा, स्वातंत्रसैनिकांचे मार्गदर्शन, महिला बचत गट मेळावा, मोबाईल दुष्परिणाम मार्गदर्शन, बालकांसाठी गोपाल पंगत, वृक्षारोपण होणार आहे. तसेच देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेने या उपक्रमाची १७ ऑगस्टला सांगता होणार असल्याचेही अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे म्हणाले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, जि.प.च्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी यांची उपस्थिती होती.