हरंगुळ ते पुणे रेल्वेसेवा मंगळवारपासून सुरू होणार
By आशपाक पठाण | Published: October 6, 2023 09:27 PM2023-10-06T21:27:20+5:302023-10-06T21:28:55+5:30
विशेष रेल्वे तीन महिने धावणार: दररोज दुपारी ३ वाजता निघणार पुण्याला.
आशपाक पठाण, लातूर : मागील अनेक दिवसांपासून मागणी असलेली हरंगुळ (लातूर) ते पुणे रेल्वेसेवा मंगळवार १० ऑक्टोबरपासून दैनंदिन सुरू होत आहे. मात्र, लातूर रेल्वेस्टेशनऐवजी ही गाडी हरंगुळ स्थानकातून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. दररोज दुपारी ३ वाजता हरंगुळ येथून निघणारी ही रेल्वे पुण्यात ९ वाजता पाेहचणार आहे.
मुंबईहून येणाऱ्या लातूर रेल्वेत अनेकदा पुण्याच्या प्रवाशांना जागा मिळत नव्हती. त्यामुळे स्थानकातून मध्यरात्रीच्या वेळी प्रवाशांना परत जावे लागत होते. आता मुंबईहून येणाऱ्या रेल्वेत जागा नाही मिळाली सकाळी पुण्याहून लातूरपर्यंतच्या प्रवाशांची नव्या रेल्वेमुळे सोय होणार आहे. पुणे येथून दररोज सकाळी ६.१० वाजता हरंगुळसाठी रेल्वे निघणार आहे. दुपारी १२.५० वाजता ही गाडी हरंगुळला येईल. येथील स्थानकात जवळपास दोन तास थांबल्यावर पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहे. पुण्यासाठी दुपारी ३ वाजता येथून ही रेल्वे निघणार आहे. पुणे स्टेशन येथे रात्री ९ वाजता पोहचणार आहे.
१५ डब्याची रेल्वे, इथे आहे थांबा...
हरंगुळ- पुणे ही रेल्वे १५ डब्याची आहे. त्यामुळे जवळपास एक हजार ते बाराशे प्रवासी सहजपणे प्रवास करू शकतील. हडपसार, उरूळी, केडगाव, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी, धाराशिव आदी स्थानकावर थांबेल. ८ ऑक्टोबरपासून बुकींग सुविधा सुरू होणार आहे.
प्रवाशांची चांगली सोय झाली...
पुणे ते हरंगुळ ही विशेष रेल्वे १० ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. मुंबई-लातूर रेल्वेत जागा न मिळणाऱ्या प्रवाशांना ही रेल्वे फायद्याची ठरणार आहे. दिवसा सुविधा असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी हा प्रवास सुखकर होईल. - मोतीलाल डोईजोडे. सदस्य, दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समिती.
लातूर स्टेशनवर यायला हवी...
पुणे हरंगुळ ही नविन विशेष रेल्वे सेवा सुरू होणार आहे. पण ती गाडी दीड तास हरंगुळ स्टेशनवर उभी राहणार आहे. पुढे लातूरला येणार नाही, हे चुकीचे आहे. लातूरच्या स्टेशनवर आल्या प्रवाशांची सोय होईल. रेल्वे बाेर्डाने यावर त्वरीत निर्णय घ्यावा. - शिवाजी नरहरे, दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती, लातूर.
प्रतिसाद मिळाल्यास कायम राहील...
दिवाळी सणात फायदा होईल. कोणतीही नवीन गाडी सुरू करीत असताना काही दिवस प्रयोग केला जातो. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला की ती गाडी कायम केली जाते. त्यामुळे आपल्या भागातील प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा. परिणामी, ही रेल्वे कायमस्वरूपी सुरू राहील. शामसुंदर मानधना, सदस्य, मध्य रेल्वे रेल्वे सल्लागार समिती.