खूनप्रकरणी दाेघा आराेपींना सक्तमजुरी; लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
By राजकुमार जोंधळे | Published: July 7, 2024 01:19 PM2024-07-07T13:19:28+5:302024-07-07T13:19:54+5:30
या खटल्यात एकूण १९ जणांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली आहे.
लातूर : ट्रकवर साेबत गेलेल्या व्यक्तीच्या खूनप्रकरणी लातूर येथील सत्र न्यायालयाने एकाला पाच वर्षाची, तर दुसऱ्याला तीन वर्षाची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. या खटल्यात एकूण १९ जणांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली आहे.
चाकूर तालुक्यातील अलगरवाडी येथील ज्ञानेश्वर देवकत्ते हा गावातील अलंकार केंगार याच्यासाेबत ट्रकवर जाताे म्हणून २२ मे २०२१ राेजी अलगरवाडी पाटीकडे गेला. २५ मे २०२१ राेजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास अलंकार केंगार, सचिन घुमे यांनी ट्रकच्या केबिनमध्ये ज्ञानेश्वर यास हात-पाय दाेरीने बांधलेल्या अवस्थेत घेऊन आले. ज्ञानेश्वरचा भाऊ ज्ञानाेबा देवकत्ते, चैतन्य देवकत्ते याच्याकडे देऊन ट्रक घेऊन निघून गेले. ज्ञानेश्वर याचे हातपाय थंड हाेते. डाेक्यात जखमा हाेत्या. त्याच्यावर चुना लावला हाेता. शिवाय, शरीरावर मारहाणीच्या खुणा हाेत्या. मयताचा भाऊ ज्ञानाेबा देवकत्ते यांनी चाकूर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सचिन घुमे आणि अलंकार केंगार याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. चाकूर येथील पाेलिस उपनिरीक्षक एस. एस. सूर्यवंशी यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण १९ जणांची साक्ष तपासण्यात आली.
सुनावणीदरम्यान उपलब्ध ताेंडी पुरावा, कागदपत्राच्या आधारे लातूर येथील तिसरे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. बी. माने यांनी आराेपी अलंकार केंगार याला कलम ३०४ (।।) भादंविप्रमाणे पाच वर्षे सक्तमजुरी, पाच हजार दंड, कलम ३२४ भादंविप्रमाणे तीन वर्ष सक्तमजुरी, तीन हजार दंड, कलम ३२३ भादंविप्रमाणे सहा महिने सक्तमजुरी, दाेन हजार दंड अशी शिक्षा ठाेठावली. दुसरा आराेपी सचिन घुमे याला कलम ३२४ भादंविप्रमाणे तीन वर्षे सक्तमजुरी, तीन हजार दंड, कलम ३२३ भादंविप्रमाणे सहा महिने सक्तमजुरी, दाेन हजार दंड अशी शिक्षा ठाेठावली. दंडाची रक्कम मयताची पत्नी, मुलांना नुकसानभरपाई म्हणून द्यावी, असा आदेश दिला.
सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील विठ्ठल देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. परमेश्वर तल्लेवाड यांनी सहकार्य केले. काेर्ट पैरवी चाकूरचे हवालदार सी. जी. राचमाले यांनी केली.