अंधांना प्रशिक्षणातून स्वावलंबनाचे धडे देणारी 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 06:19 PM2019-02-12T18:19:13+5:302019-02-12T18:38:28+5:30
हरिश्चंद्राची ही फॅक्टरी अंधांसाठी आधारवड ठरली आहे़
- आशपाक पठाण
लातूर : दृष्टिहीन म्हटलं की कुटुंब असो की समाज त्यांच्याकडे हिनतेने पाहतो़ शिक्षण झाले तरी रोजगाराच्या अपुऱ्या संधी़ यातून आलेल्या नैराश्येने अनेकजण भिक्षा मागून उपजीविका भागवितात़ त्यामुळे संसार तर दूरच समाजात प्रतिष्ठाही मिळत नाही़ मात्र, बुधोड्याच्या अपंग पुनर्वसन केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्यांना स्वयंरोजगारातून प्रतिष्ठेबरोबरच स्वावलंबनाचे धडे दिले जातात़ प्रेरणा, प्रोत्साहन, ऊर्जा देण्याचे काम होत असल्याने हरिश्चंद्राची ही फॅक्टरी अंधांसाठी आधारवड ठरली आहे़
औसा तालुक्यातील बुधोडा येथे ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून हरिश्चंद्र सुडे यांनी ३९ वर्षांपूर्वी अंध अपंग पुनर्वसन केंद्रातून हातमागाचे मोफत प्रशिक्षण सुरू केले़ या केंद्रात अंधांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी धडपड केली जाते़ विशेष म्हणजे, समाजात आधार नसलेल्या तरूणांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ‘आसरा’ही (आश्रय) दिला जातो़ त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश आदी राज्यातून प्रशिक्षणासाठी अंधाचा ओढा वाढत आहेक़ापड निर्मितीत आधुनिकीकरण आल्याने हातमागाचे महत्व कमी होत आहे, नेमकी हीच बाब लक्षात घेऊन निसर्गोपचार प्रशिक्षण व उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्वतंत्रपणे मानव वेदना मुक्ती केंद्र उभारले असून नाडी प्रशिक्षणातून संबंधित रूग्णांचे आजार ओळखले जातात़ ज्यांना दृष्टी नाही, तेच आज डोळस लोकांना दिशा देण्याचे काम करीत आहेत़ ३९ वर्षांपासून सुरू असलेल्या हरिश्चंद्राच्या या फॅक्टरीतून आजवर १ हजार २०० लोकांनी प्रशिक्षण घेऊन स्वंयरोजगाराचा मार्ग निवडला आहे़
डोळसांना लाजवणारी धडपड़
पुनर्वसन केंद्रात सकाळी रूग्णसेवा झाल्यावर प्रत्येकजण आपापल्या कामात रमतात़ हातमागाच्या साह्याने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तर जुन्या साड्यातून सतरंज्या तयार करण्याचे काम केले जाते़ यातून सीझनमध्ये चांगले पैसे मिळतात़ मात्र, ते बारमाही नसल्याने कधी कधी अडचण होते़ बदलत्या काळानुसार मानवाच्या गरजा लक्षात घेऊन निसर्गोपचार प्रशिक्षण सुरू करण्यात आले़ इथे प्रशिक्षणाबरोबरच रोजगार मिळवून दिला जात असल्याचे १२ वी विज्ञानपर्यंत शिक्षण घेतलेले दृष्टिहीन प्रशिक्षक भारत वाघमारे स्वाभिमानाने सांगत होते़
मसाज ठरले रोजगाराचे साधऩ
केंद्रात आजवर २४० लोकांनी निसर्गोपचाराचे प्रशिक्षण घेतले़ यातील १५० जण विविध ठिकाणी उपचाराचे काम करीत आहेत़ गरजूंना घरपोच सेवा देण्याचे कामही केले जात असल्याने रोजगाराचे चांगले साधन निर्माण झाले आहे़ मानव वेदना मुक्ती केंद्रात दृष्टिहीन असलेले १५ जण विविध प्रकारच्या जुनाट रोगांवर उपचार करतात. तर हातमागाच्या कामातून जवळपास ४० जणांना रोजगार मिळाला. या पैशातून आपला संसाराचा गाडा चालवीत आहेत़ त्यामुळे त्यांना कोणासमोर मदतीसाठी हात पसरावे लागत नाही, असे संस्थेचे प्रमुख हरिश्चंद्र सुडे यांनी सांगितले़
नाविन्यपूर्ण उपक्रम
अंधांसाठी रोजगार निर्मिती करणे मोठे आव्हान आहे. मात्र स्वाधार केंद्राने आधुनिक प्रशिक्षणाची संधी देऊन अॅक्युप्रेशर मसाजच्या माध्यमातून किफायतशीर रोजगार देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
- प्रशांत सुडे, संस्थेचे समन्वयक