"हत्तीबेटचा विकास वेरूळ-अजिंठ्याच्या धर्तीवर करणार, विकास कामांना सुरुवात"
By संदीप शिंदे | Published: August 13, 2023 08:24 PM2023-08-13T20:24:14+5:302023-08-13T20:24:49+5:30
क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांची माहिती
संदीप शिंदे, उदगीर (जि.लातूर) : यापुढे हत्तीबेट 'ब' वर्गीय पर्यटन स्थळाचा विकास वेरूळ -अजिंठ्याच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. शिवाय या पर्यटनाच्या दर्जात रूपांतर करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी येथे दिली.
उदगीर व देवणी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हत्तीबेट 'ब'वर्गीय पर्यटन स्थळावर ३ कोटी २९ लाख रूपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. मंचावर माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सीईओ अनमोल सागर, बसवराज पाटील नागराळकर, माजी जि.प. उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके, गोविंदराव चिलकुरे, विशेष कार्य अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार रामेश्वर गोरे, प्रा.शाम डावळे, भरत चामले, सरपंच अभिजित साकोळकर, कार्यकारी अभियंता एम.एम.पाटील, सायस दराडे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, शंकर रोडगे, उपअभियंता एल.डी. देवकर, पत्रकार व्ही.एस. कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी क्रीडामंत्री म्हणाले, हत्तीबेट लातूर जिल्ह्यातील पहिले 'ब' पर्यटन स्थळ आहे. याचा विकास करताना इथल्या लेण्या पर्यटकांना खुल्या करून देताना वेरूळ-अजिंठा सारखा विकास करायचा आहे. त्यासाठी विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून करावा. हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षे म्हणून साजरा करत आहोत. ज्या हत्ती बेटावर आपण आज विविध विकास कामे केली, तिथे किसान दलाने निजामाविरुद्ध युद्ध केले आहे. शिवाय तोंडचिरच्या रामघाट येथेही लढाई झाली होती. अशा महत्वाच्या पाऊल खुणा जिथे जिथे आहेत, तिथे कायमस्वरूपी त्या घटनांचे स्मरण होण्यासाठी काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हाधिकारी, सीईओ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन धनंजय गुडसूरकर यांनी केले. तर आभार चंद्रप्रकाश खटके यांनी केले. प्रारंभी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात संतुकराव कुलकर्णी स्मृती देवर्जन भूषण पुरस्कार उदगीरचे रवींद्र साकोळकर व शिवशंकर कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.
राज्यात ऑलिम्पिक भवन उभारणार...
राज्याचा क्रीडा मंत्री झाल्यानंतर अनेक कामाला गती दिली असून, पुण्याच्या बालेवाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ उभे राहत आहे. त्या विद्यापीठासाठी क्रीडा क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीला कुलगुरू म्हणून नियुक्त करणार आहोत. हरियानाप्रमाणे ऑलिम्पिक भवन महाराष्ट्रात उभे करणार असून, त्यासाठी ४४ कोटी रुपये शासनाने मंजूर केले असल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी दिली.