घर मालकाच्या गळ्याला चाकू लावून दीड लाखाचा ऐवज पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 02:52 PM2020-11-04T14:52:22+5:302020-11-04T14:53:48+5:30
१ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिणे आणि मोबाईल लंपास
उजनी (जि़ लातूर) : घर मालकाच्या गळ्यास अज्ञात चार- पाच चोरट्यांनी चाकू लावून १ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिणे आणि मोबाईल असा एकूण १ लाख ६३ हजारांचा ऐवज पळविल्याची घटना औसा तालुक्यातील उजनी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
उजनी मोडनजीक सहशिक्षक रघुनाथ वळके यांचे घर आहे. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी रात्री झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चार- पाच चोरट्यांनी घराच्या खिडकीतून पाईप घालून दरवाज्याची आतील कढी काढली. त्यानंतर घरात प्रवेश केला़ बेडरुममधील कपाटाचे दार काढत असताना आवाजाने घरमालक उठले. तेव्हा चार- पाच जण दिसले. त्यांनी चोरट्यांना दरडावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या गळ्याला चाकू लावून काहीही बोलायचे नाही, अन्यथा जीवे मारु अशी धमकी देत, कपाटाच्या चाव्या काढून घेतल्या़
घरातील १ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिणे आणि मोबाईल असा एकूण १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. दरम्यान, जाताना चोरट्यांनी घराला बाहेरुन कडी घातली. त्यामुळे घरमालकांनी शेजाऱ्यांना आवाज देऊन ही माहिती दिली. याप्रकरणी रघुनाथ वळके यांच्या फिर्यादीवरुन भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांकडून पाहणी...
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, भादा ठाण्याचे पोनि़ संदीप भारती यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.