रात्री बसस्थानकावर झोपला होता, सकाळी पाझर तलावात आढळला मृतदेह
By हरी मोकाशे | Published: October 15, 2022 05:26 PM2022-10-15T17:26:20+5:302022-10-15T17:26:58+5:30
कौटुंबिक कलाहामुळे तो व्यसनाच्या आहारी गेला होता, असे सांगण्यात येत आहे.
किनगाव (जि. लातूर) : रेणापूर तालुक्यातील सय्यदपूर येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीचा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
प्रवीण उर्फ दत्तात्रय लक्ष्मण चिंतलवाड (३५, रा. सय्यदपूर, ता. रेणापूर) असे मयताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री पोलीस गस्त घालताना प्रवीण चिंतलवाड हा किनगाव बसस्थानक परिसरात झोपल्याचे आढळून आला होता. पोलिसांनी त्याची चौकशी करुन नाव नोंदविले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेल्या तलावात आढळून आला.
कौटुंबिक कलाहामुळे तो व्यसनाच्या आहारी गेला होता, असे सांगण्यात आले. परंतु, तो पाण्यात का उतरला होता, यासंदर्भात पोलीस तपास करीत आहेत. उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात करुन शवविच्छेदनाननंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताचा भाऊ प्रदीप चिंतलवाड यांच्या खबरीवरून किनगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि. शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली किनगाव पोलीस करीत आहेत.