उकाडा कमी होईना... धग कायम! भूजलपातळी आणखी खालावली, वरुणराजाकडे लक्ष

By हरी मोकाशे | Published: June 7, 2024 06:17 PM2024-06-07T18:17:22+5:302024-06-07T18:17:53+5:30

मागील पाच वर्षांच्या तुलनेत मे अखेरीस २.६७ मीटरची घट

heat does not decrease warmth remains same as Ground water level further lowered all eyes to rains | उकाडा कमी होईना... धग कायम! भूजलपातळी आणखी खालावली, वरुणराजाकडे लक्ष

उकाडा कमी होईना... धग कायम! भूजलपातळी आणखी खालावली, वरुणराजाकडे लक्ष

हरी मोकाशे, लातूर: मान्सूनपूर्व पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला असला तरी उन्हाची धग कायम आहे. दरम्यान, मे अखेरीसच्या निरीक्षणात जिल्ह्याची भूजल पातळी २.६७ मीटरने खालावल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारपासून मृगास प्रारंभ झाल्याने आशा उंचावल्या असून सर्वांचे वरुणराजाकडे लक्ष लागून आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे प्रकल्पांमध्ये जलसंचय झाला नसल्याने हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. तद्नंतर फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि मे महिन्यात तर तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याने जीवाची काहिली होऊ लागली. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने जलसाठ्यात झपाट्याने घट झाली. मार्चमध्ये जिल्ह्यातील १०९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असता मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळीत २.१३ मीटरने घट झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता मे अखेरीसच्या निरीक्षणात आणखीन घट होऊन २.६७ मीटरने भूजल पातळी खालावली आहे.

सर्वच तालुक्यांच्या पाणीपातळीत घट

तालुका - घट (मीटरमध्ये)

  • अहमदपूर - ३.७६
  • औसा - ३.३९
  • चाकूर - २.९६
  • देवणी - १.२९
  • जळकोट - १.५४
  • लातूर - १.४७
  • निलंगा - ३.२७
  • रेणापूर - २.१४
  • शिरुर अनं.- ४.७१
  • उदगीर - २.१२
  • सरासरी - २.६७


शिरुर अनंतपाळची पाणीपातळी सर्वात कमी...

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी पावसाळापूर्व म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस निश्चित विहिरींचे निरीक्षण करण्यात येते. यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणीपातळीत २.६७ मीटरने घट झाली आहे. सर्वाधिक पाणीपातळी शिरुर अनंतपाळ तालुक्याची कमी झाली आहे. ४.७१ मीटरने घट झाली आहे. त्यापाठोपाठ अहमदपूर - ३.७६, औसा- ३.३९ मीटरने कमी झाली आहे.

दोन वर्षांपासून सातत्याने घट...

  • २०२४ : -२.६७
  • २०२३ : ०.४६
  • २०२२ : २.१९


जिल्ह्यातील ४६ गावांना टँकरने पाणीपुरवठा...

सध्या जिल्ह्यातील ३० गावे आणि १६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक गावे लातूर तालुक्यातील असून ११ अशी संख्या आहे. औश्यातील १०, रेणापूर- २, उदगीर - ४, अहमदपूर- ९, जळकोट तालुक्यातील १० गावांमध्ये टँकर सुरु आहेत. चाकूर, देवणी, निलंगा आणि शिरुर अनंतपाळ या चार तालुक्यांत एकही टँकर नाही.

Web Title: heat does not decrease warmth remains same as Ground water level further lowered all eyes to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.