लातूर जिल्ह्यात धो..धो..बरसला! ३४ महसूल मंडळात अतिवृष्टी; नद्या, नाले, ओढेही झाली वाहते
By आशपाक पठाण | Published: June 11, 2024 05:38 PM2024-06-11T17:38:47+5:302024-06-11T17:40:08+5:30
खरीप पिकाच्या पेरणीसाठी पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी रात्री झालेल्या पावसाने पेरणीसाठी दिलासा दिला.
लातूर : मृग नक्षत्राच्या प्रारंभी यंदा पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. मागील पाच दिवसांपासून लातूर जिल्ह्यात विविध भागात पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असून तब्बल ३४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. चाकूर तालुक्यातील नळेगावनजीक घरणी नदीवरील तात्पुरता उभारण्यात आलेल्या पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक इरतत्र वळविण्यात आली आहे.
खरीप पिकाच्या पेरणीसाठी पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी रात्री झालेल्या पावसाने पेरणीसाठी दिलासा दिला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस अनेक ठिकाणी रात्रभर सुरूच होता. जिल्ह्यातील दहापैकी सहा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेकांच्या शेतातून पाण्याचे पाट वाहिल्याने माती वाहून गेली आहे. लातूर तालुक्यातील मुरूड, तांदुळजा, सारसा, टाकळगाव शिवारात काही शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस निलंगा, औसा तालुक्यात झाला आहे.
कोणत्या तालुक्यात किती पाऊस...
लातूर जिल्ह्यात सोमवारी रात्री ६३.७ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत १३५.८ मि.मी. पाऊस झाला आहे. एका रात्रीत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसात सर्वाधिक ८५.८ मि.मी.पाऊस निलंगा तालुक्यात झाला आहे. जळकोट तालुक्यात केवळ ९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका पडलेला पाऊस:
लातूर ७७.५
औसा ८४.१
अहमदपूर ४१.२
निलंगा ८५.८
उदगीर १६.२
चाकूर ७७.३
रेणापूर ७८.२
देवणी २४.६
शिरूर अनंतपाळ ७४.३
जळकोट ९.८
सात महसूल मंडळात १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस....
जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रात्रभर झालेल्या दमदार पावसात या भागात नद्या, नाले तुंडूंब भरून वाहत आहेत. लातूर तालुक्यातील मुरूड ११५.८, कासारखेडा १०६.८, औसा तालुक्यातील लामजना १०२, किल्लारी १०२, निलंगा १११.५, चाकूर १००, नळेगाव मंडळात ११२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. या भागातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.
या महसूल मंडळात धो..धो..बरसला...
मृग नक्षत्राच्या प्रारंभी जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. मागील पाच दिवसांपासून रोज पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्री ११ ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ३४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यातील सहा महसूल मंडळात १००मिमी.पेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकरी आता पेरणीसाठी सज्ज झाला आहे. लातूर महसूल मंडळात ६९.३, बाभळगाव ६९.३, हरंगुळ बु. ६९.३, तांदुळजा ६८.३, चिंचोली बल्लाळनाथ ६८.३, कन्हेरी ७४.८, औसा ८१.८, मातोळा ८१.८, भादा ८१.८, बेलकुंड ८१.८, किनी ९१.५, पानचिंचोली ८१, निटूर ८७.८, औराद शहाजानी ८४, कासार बालकुंदा ८०, अंबुलगा ९९.०, मदनसुरी ९७.३, कासारसिरसी ६६.८, हलगार ८४.०, भुतमुगळी ६६.८, नळेगाव ७८.८, रेणापूर ८२, पोहरेगाव ६५.५, पानगाव ९८.८, पळशी ८४.५, शिरूर अनंतपाळ ८७.८, हिसामाबाद महसूल मंडळात ८७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
पावसाने उघडीप दिल्यास पेरणीला प्रारंभ...
जिल्ह्यात उदगीर, जळकोट, देवणी तालुका वगळता इतर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. खरीपाच्या पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी आता पेरणीला लागणार आहेत. त्यासाठी एक ते दोन दिवस पावसाने उघडीप दिली की लागलीच पेरण्याला प्रारंभ केला जाईल, असे सुगाव येथील शेतकरी श्रीकृष्ण शिंदे यांनी सांगितले.