वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:00 AM2021-01-08T05:00:24+5:302021-01-08T05:00:24+5:30
निलंगा/ औराद शहाजानी/ येरोळ : निलंगा शहरासह तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात बुधवारी रात्री अचानकपणे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. ...
निलंगा/ औराद शहाजानी/ येरोळ : निलंगा शहरासह तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात बुधवारी रात्री अचानकपणे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रबीतील ज्वारी, हरभरा, तूर, ऊस, करडईसह भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. औराद हवामान केंद्रावर ३६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी बाष्पयुक्त वाऱ्यामुळे अचानक औरादसह परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर मध्यरात्री पुन्हा जाेरदार पाऊस झाला. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांबरोबरच जमिनींचे नुकसान झाले होते. आता बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे रबी पिके भुईसपाट झाली आहेत.
दरम्यान, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याची फूलगळती झाली आहे. तसेच भुरी, करपा, दावणी यासारख्या राेगांचा प्रादुर्भाव झाला असून द्राक्ष बागायतदारांचे माेठे नुकसान झाल्याचे शेतकरी भागवत बिरादार म्हणाले. दरम्यान, तगरखेडा येथील शेतकरी डिगंबर बिरादार यांच्या शेतातील दाेन एकर रबी ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे. सावरी, हालसी व तगरखेडा या शेतशिवारात जास्त नुकसान झाले आहे.
गुंजरगा परिसरास फटका...
निलंगा तालुक्यातील शंकर धुमाळ, रमेश धुमाळ, गणेश धुमाळ, अशोक शिंदे, दत्ता शिंदे, नंदकुमार धुमाळ, विठ्ठल धुमाळ, चंदर धुमाळ, बंकट धुमाळ, राजकुमार शिंदे, धनराज शिंदे, परमेश्वर धुमाळ, भीम धुमाळ, तानाजी धुमाळ, मुकेश धुमाळ, अंकुश धुमाळ, रामराज धुमाळ, वसंत फलाटे, दत्ता शिंदे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे ज्वारीचे नुकसान झाले आहे.
प्रशासनाकडून पाहणी नाही...
बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा महसूल विभागाकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.