महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात पावसाचा हाहा:कार; तुगाव-मेहकर मार्गावरील वाहतूक ठप्प
By राजकुमार जोंधळे | Published: August 4, 2022 03:42 PM2022-08-04T15:42:07+5:302022-08-04T15:44:02+5:30
ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने भालकी तालुक्यातील तुगाव (हलसी) गावामध्ये पुराचे पाणी घुसले आहे.
भालकी (जि. बिदर) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील तुगाव-हालसी (ता. भालकी) परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने हाहा:कार उडला आहे. तुगाव- मेहकर मार्गावरील पूल पाण्यात गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक सध्याला ठप्प झाली आहे. तसेच भालकी तालुक्यातील तुगाव (हलसी) गावामध्ये पाणी घुसले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच मोठा पाऊस झाला आहे. भालकी तालुक्यातील तुगाव (हलसी) गावामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. गावात सर्वत्र पाणी घुसल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती.तर शाळेतील विद्यार्थ्यांना तीन तास शाळेतच रोखवून ठेवण्याची वेळ शिक्षकांवर आली. तसेच तुगाव-मेहकर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे शेतकरी शेतातच अडकून पडले आहेत. शेत-शिवारातील ओढ्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांना शेतातच थांबावे लागले आहे.पहिल्यांदाच गावात पूरस्थिती आल्याचे वयोवृद्ध, जेष्ठ नागरिकांनी सांगितले.