लातूरसह जिल्हाभरात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:24 AM2021-09-06T04:24:06+5:302021-09-06T04:24:06+5:30
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. आतापर्यंत दमदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांन मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. ...
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. आतापर्यंत दमदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांन मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. शनिवारी रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६५२.१ मिमी पाऊस झाला आहे. शनिवारी ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. याशिवाय, ७ मंडळात ५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, या पावसामुळे मांजरा नदीवरील धनेगाव आणि डाेंगरगाव उच्चस्तरीय बंधारे भरले आहेत. त्यामुळे प्रशासनाने दोन्ही प्रकल्पांवरील दारे उघडली आहेत, तसेच तेरणावरील सर्व उच्चस्तरीय बंधाऱ्यांची दारे उघडण्यात येऊन पाणी सोडून देण्यात आले आहे. रविवारी सकाळपर्यंत लातूर तालुक्यात ५४.५ मि.मी., औसा ३१.९, अहमदपूर ३३.६, निलंगा ४१, उदगीर ३४.७, चाकूर ५७.३, रेणापूर ७४.९, देवणी ७९.२, शिरुर अनंतपाळ ४६.४ तर जळकोट तालुक्यात १६.७ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकूण ४६ मि.मी. पाऊस झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
आतापर्यंत ६५२.१ मि.मी.पाऊस...
जिल्ह्याची पावसाची वार्षिक ७९० मि.मी. असून, आतापर्यंत ६५२.१ मि.मी. पाऊस झाला आहे. जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने वेळेवर पेरण्या झाल्या. मध्यंतरी महिनाभर पावसाने उघडीप दिल्याने शेतशिवारातील पिके कोमेजू लागली होती. दरम्यान, शनिवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्याने खरिपातील पिकांसाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे. या पावसाने नदी, नाले प्रवाहित झाले असून, लघू, मध्यम प्रकल्पातही पाण्याची आवक होत आहे.