अवकाळी तडाखा! लातूरात पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी; तीन दिवसांत वीज पडून तिघांचा मृत्यू

By हणमंत गायकवाड | Published: April 28, 2023 06:13 PM2023-04-28T18:13:39+5:302023-04-28T18:13:52+5:30

मेघ गर्जनेसह २६ एप्रिलपासून लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत आहे.

Heavy rains in five revenue circles in Latur district; Three people died due to lightning in three days | अवकाळी तडाखा! लातूरात पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी; तीन दिवसांत वीज पडून तिघांचा मृत्यू

अवकाळी तडाखा! लातूरात पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी; तीन दिवसांत वीज पडून तिघांचा मृत्यू

googlenewsNext

लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असून, शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३९.५ मि.मी. पाऊस झाला आहे. नागलगाव, तांदुळजा, किल्लारी आणि बोरोळ महसूल मंडळात पावसाळ्याप्रमाणे अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाला असून, २९ जनावरांसह २० कोंबड्या दगावल्या आहेत. 

मेघ गर्जनेसह २६ एप्रिलपासून लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. २७ आणि २८ एप्रिल रोजी पावसाळ्याप्रमाणे पाऊस बरसला. २८ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३९.५ मि.मी. पाऊस झाला आहे. तर २७ एप्रिल रोजी ४.७ मि.मी. पावसाची नोंद आहे. एप्रिल महिन्यामध्ये ६७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नागलगाव महसूल मंडळात ८७.८, तांदुळजा १२३, किल्लारी ८७, बोरोळ १३५, औराद शहाजानी ६२, हलगरा महसूल मंडळात ६० मि.मी. पाऊस झाला आहे. जिथे ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडतो तिथे अतिवृष्टी झाली, असे संबोधले जाते. त्यानुसार पाच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

तिघांचा वीज पडून मृत्यू
२६ ते २८ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तिघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. त्यात निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील राजप्पा व्यंकट कल्याणी (तगरखेडा ता. निलंगा, जि. लातूर), धोंडिराम कुंडलिक भोसले (बोरगाव, ता.चाकूर, जि. लातूर), तसेच आरूषी नथुराम राठोड (मुबारकपूर ता. निलंगा जि. लातूर) यांचा समावेश आहे. शेतात गेल्यानंतर वीज अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

२९ जनावरे दगावल्याने मोठे नुकसान
२६ ते २८एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामध्ये २९ पशुधनाचे नुकसान झाले आहे. २० कोंबड्याही दगावल्या आहेत. देवणी तालुक्यातील इंद्राळ येथील सुनील बसवंत नस्के यांची एक म्हैस, हरिजवळगा येथील सतीश मोहन सोनटक्के यांची म्हैस, शेळगाव येथील विठ्ठल शेषेराव वागलगावे यांच्या तीन शेळ्या, रावणकोळा येथील मोतीराम माणिकराव हुंडेकरी यांचा एक बैल, हाडगा येथील गहिनीनाथ नागनाथ जाधव यांच्या दोन गायी, एक वगार, तीन शेळ्या व २० कोंबड्या दगावल्या. कवठाळी येथील सूर्यकांत विठ्ठल माचपल्ले यांची एक म्हैस तसेच झरी बु. येथील बागवान फतरू शेख यांची एक म्हैस दगावली. डिगोळ येथील जगन्नाथ वैजनाथ कोटे यांची एक म्हैस, गुडसूर येथील गजानन जयंत मुस्कावाड यांच्या दोन वगारी, होसुरी येथील बालाजी बिरादार यांचे दोन बैल, तगरखेडा येथील धनराज हिरागीर यांची एक म्हैस, हरिजवळगा येथील रतन गिरी यांचे तीन बैल, शिरूर अनंतपाळ येथील तानाजी फुलारी यांची एक गाय, भंगेवाडी येथील ज्ञानेश्वर बब्रुवार कंदगुळे यांचा एक बैल, रावणकोळा येथील लक्ष्मण हिराचंद राठोड यांचा एक बैल, हनमंतवाडी येथील ज्ञानोबा गोपाळ यलमटे यांची एक म्हैस दगावली.

Web Title: Heavy rains in five revenue circles in Latur district; Three people died due to lightning in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.