हेल्मेटमुळे वाचले असते २३२ जणांचे प्राण; लातूरमध्ये आठ महिन्यांत ५३९ अपघात
By आशपाक पठाण | Published: October 7, 2023 06:59 PM2023-10-07T18:59:08+5:302023-10-07T18:59:37+5:30
दुचाकीचेच सर्वाधिक ७० टक्के अपघात. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
लातूर : दुचाकीवर हेल्मेट वापरणे मोटार वाहन कायद्यानुसार बंधनकारक असले तरी आपल्याकडे याकडे कोणी लक्षच देत नाही. परिणामी, अपघातात सर्वाधिक मृत्यू होण्याचे प्रमाण दुचाकी अपघाताचेच असल्याचे समोर आले आहे. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात ५३९ अपघात झाले आहेत. त्यात ७० टक्के अपघात दुचाकीचे असून, यात घटनेत दुचाकीवरील २३२ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्याकडे हेल्मेट असते तर जीव वाचला असता, असे समोर आले आहे.
वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शाळा, कॉलेजला जाण्यासाठी अनेक पालक अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देत आहेत. ही मुले अनेकदा चढाओढ करून वेगमर्यादेचे उल्लंघन तर करतातच शिवाय, हेल्मेट किंवा इतर वाहतूक नियमांचे पालनही करीत नाहीत. त्यामुळे दुचाकी घसरून पडले तरी डोक्याला गंभीर मार लागून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लातूर जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत झालेल्या एकूण अपघातात सर्वाधिक जवळपास ३०९ अपघात हे दुचाकीचे झाले आहेत. यात २३२ जणांना जीव गमवावा लागला आहे. हेल्मेट वापराकडे केलेले दुर्लक्ष अनेकांच्या अंगलट आले आहे.
रस्ता ओलांडताना होतात अपघात...
राष्ट्रीय महामार्ग, शहरातील मुख्य मार्गावरील डिव्हायडरमधून वळण घेताना दुचाकी अपघाताच्या घटना वाढत आहेत. लातूर एमआयडीसी, उदगीर, औसा, किल्लारी, रेणापूर या भागात दुचाकीचे अपघात जास्त आहेत. वाहनांची वर्दळ अधिक असतानाही नियमांकडे होत असलेले दुर्लक्ष जिवावर बेतत असल्याचे समोर आले आहे.
अल्पवयीन मुलांना वाहन, पालकांना ३ लाख २० हजार दंड...
अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण जास्त आढळून आल्याने महिनाभरापूर्वी परिवहन विभागाकडून शाळा, कॉलेजमध्ये कारवाई मोहीम राबविण्यात आली. त्यात दुचाकीवरील अल्पवयीन ३२ मुले पकडण्यात आली. त्यांना आरटीओ कार्यालयात आणून पालकांनाही सूचना करण्यात आल्या. त्यांच्याकडून प्रत्येकी १० हजारांप्रमाणे ३ लाख २० हजार दंड वसूल करण्यात आला. तरीही पालक अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देतात, आपल्या मुलांचा जीव आपण धोक्यात घालत आहोत, हे समजायला हवे.
मार्गदर्शन शिबिरातून नुसतीच चर्चा...
दरवर्षी अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत वाहतूक नियमांचे प्रबोधन केले जाते. लातूर, उदगीर व अहमदपूर शहरातील प्रमुख शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांसह हेल्मेट, सीटबेल्टचा वापर यावर मार्गदर्शन केले जाते. शिक्षक, पालक, विद्यार्थी तात्पुरते भावनिक होतात, पुन्हा नियमांकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावर फिरतात.
अपघात रोखण्यासाठी अशी घ्या काळजी...
अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करायला पाहिजे. दुचाकीवर हेल्मेट, कारमध्ये सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. मद्य प्राशन करून वाहन चालवू नये. पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हाती कोणतेही वाहन देऊ नये. मुलांपेक्षा पालकांनी अधिक जागरूकता बाळगल्यास अपघात कमी होतील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये सांगितले.
हेल्मेट नसेल तर १ हजारांचा दंड...
दुचाकीवर हेल्मेटचा वापर वाढावा म्हणून खरेदी, नोंदणीच्या वेळी हेल्मेटची सक्ती करण्यात आली. अनेक जण नवीन हेल्मेट घेतात, पण बाहेर पडले की ते आणत नाहीत. हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी आहे. विनाहेल्मेट प्रवास करीत असताना आढळल्यास १ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.