काेरडा दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजारांची मदत करा, शेतकऱ्यांनी केला रास्तारोको
By संदीप शिंदे | Published: September 7, 2023 02:52 PM2023-09-07T14:52:33+5:302023-09-07T14:53:07+5:30
येरोळमोड येथे शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
येरोळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली असून, दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शेतशिवारातील पिके वाळून चालली असून, नदी, नाले, तलाव कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, या प्रमुख मागणीसाठी येरोळमोड येथे शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता राेको आंदोलन करण्यात आले.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील शेतकरी, अमर माडजे पाटील, उपसरपंच सतिस सिंदाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुक्यात एमआयडीसी नसल्याने उपजिविकेच साधन शेती आणि दुग्ध व्यवसाय आहे. मात्र, पावसाअभावी चारा टंचाई निर्माण झाली असून, दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने येरोळ, हनमंतवाडी, कारेवाडी, चामरगा, बोळेगाव, डिगोळ, सुमठाणा, पांढरवाडी, दैठणा, तळेगाव, धामणगावसह तालुक्यातील सोयाबीन वाळून गेले आहे. तसेच कमीदाबाने विद्युत पुरवठा सुरु असल्याने वेळेवर पाणीही देता आले नाही.
त्यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, येरोळ येथे महसूल मंडळ सुरु करावे, वीजबिल, बँकेचे कर्ज माफ करावे, हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात शिवाजी पेटे, बाळासाहेब पाटील, ज्ञानोबा बालवाड, मैनोद्दीन मुजेवार, प्रभाकर पालकर, शिवानंद भुसारे, खंडेराव पाटील, संदिप पाटील, शाम सिंदाळकर, गुंडेराव चौसष्टे, विष्णु बिरादार, शिवाजी बिरादार, मच्छिंद्र भालेकर, शिवानंद भुसारे, किरण निला आदींसह शेतकरी उपस्थित होते. पोलीस निरिक्षक विठ्ठल दराडे, श्रीराम सांडुर, गुप्तहेर विभागाचे पाटील, अंबादास पाटील, मंडळ अधिकारी खंदाडे, तलाठी चव्हाण यावेळी उपस्थित होते.
मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार...
येरोळमोड येथे विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनास क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी भेट देत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून, तातडीने मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांना सांगितले.