मदत करा पण प्रसिद्धी नको, अन्यथा गुन्हा दाखल करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 12:51 AM2020-04-13T00:51:05+5:302020-04-13T00:51:20+5:30
अनेकजण गरजुंना मदत म्हणून अन्नधान्य, जेवण व इतर साहित्य देत आहेत़
लातूर : लॉकडाऊनच्या काळामध्ये जेवण, धान्य, फूड पाकिट व अन्य मदत देत असल्याचे फोटो, व्हिडीओ काढून सामाजिक माध्यमामध्ये अनेकजण पोस्ट करीत आहेत़ जिल्हाधिकाऱ्यांनी यावर निर्बंध घातले असून, गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत़ साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे परिपत्रकात जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांनी म्हटले आहे़
अनेकजण गरजुंना मदत म्हणून अन्नधान्य, जेवण व इतर साहित्य देत आहेत़ मात्र या मदतीचे फोटो, व्हिडीओ काढून ते मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर पोस्ट केले जातात़ यामुळे गरजुंचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो़, असे जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांनी सांगितले.