HHC Result: यंदाही बारावीत मुलीच सरस; लातूर विभागीय मंडळाचा ९५.२५ टक्के निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 03:12 PM2022-06-08T15:12:10+5:302022-06-08T15:13:58+5:30
लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतून ४९ हजार ९०५ मुले तर ३८ हजार ९२५ मुली असे एकूण ८८ हजार ८३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते.
लातूर : लातूर विभागीय मंडळाअंतर्गत ८८ हजार ८३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ८४ हजार ६१५ उत्तीर्ण झाले असून, मंडळाचा निकाल ९५.२५ टक्के एवढा लागला आहे. यंदाच्याही परीक्षेत मुलांपेक्षा मुलीच सरस असल्याची आकडेवारी समोर आली आहे. लातूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष तथा विभागीय सचिव सुधाकर तेलंग यांनी बुधवारी दुपारी १ वाजता पत्रकार परिषदेत बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळी त्यांनी मंडळाचा निकाल विस्तृतपणे सांगितला.
लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतून ४९ हजार ९०५ मुले तर ३८ हजार ९२५ मुली असे एकूण ८८ हजार ८३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ४७ हजार १६ मुले तर ३७ हजार ५९९ मुली असे एकूण ८४ हजार ६१५ जण उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या टक्केवारीचे प्रमाण ९४.२१ तर मुलींचे ९६.५९ अशी आहे. म्हणजेच मुलांपेक्षा २ टक्क्यांनी मुली पुढे आहेत.
लातूर जिल्ह्यातून ३५ हजार ५७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ३४ हजार ९३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ३३ हजार ६४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९६.२२ वर जाऊन पोहोचली आहे. नांदेड जिल्ह्यातून ३८ हजार ३२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ३७ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ३५ हजार ९०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नांदेड जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९४.९० आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यातून १६ हजार ३३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १६ हजार ३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १५ हजार ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उस्मानाबाद जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९३.९८ अशी आहे.
लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या तिन्ही जिल्ह्यांत लातूर ९६.२२ अव्वल क्रमांकावर त्यापाठोपाठ नांदेड ९४.९० दुसऱ्या क्रमांकावर तर उस्मानाबाद ९३.९८ तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. लातूर विभागीय मंडळाअंतर्गत पुनर्परिक्षार्थी म्हणून २५५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी २५४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १४५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ५७.३२ एवढी आहे.