लातूर-जहिराबाद महामार्गावरील भेगा दुरुस्तीसाठी हायवे परिक्रमा आंदोलन, गावकऱ्यांचा बंद
By संदीप शिंदे | Published: July 6, 2024 03:51 PM2024-07-06T15:51:40+5:302024-07-06T15:52:03+5:30
दुकाने बंद ठेवून व्यापारी, नागरिकांचा बंदला पाठिंबा
निलंगा/निटूर : तालुक्यातून गेलेल्या लातूर-जहिराबाद महामार्गावर भेगा पडल्याने दररोज अपघात होत आहेत. महामार्गाची दुरुस्ती व्हावी, यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या हायवे परीक्रमा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निटूर व्यापारी मंडळ व ग्रामस्थांनी शनिवारी कडकडीत बंद पाळून पाठिंबा दिला.
लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्णात्वाकडे जाण्याच्या आगोदरच बाभळगाव ते औराद शहाजानी दरम्यान मोठ्या भेगा पडून दोन तीन दिवसाच्या अंतरावर अपघात होऊन वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला. हायवेवरून प्रवास आणि अपघाताला निमंत्रण असेच समीकरण झाल्याने अगोदरचाच रस्ता बरा होता असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली होती. गुत्तेदाराकडे पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम असतानाही दुरुस्तीचे काम हाती घेतले नव्हते. काॅग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हायवे परीक्रमा आंदोलन पुकारण्यात आले. त्या अनुषंगानेच शनिवारी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत निटूर व्यापारी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने मार्केट बंद ठेवून परीक्रमा आंदोलनात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला.
आंदोलनात डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, पंकज शेळके, अपराजित मरगणे, गिरीश पात्रे, दिलीप हुलसुरे, शकील पटेल, संजय बिराजदार, दिनकर निटुरे, अशोक हसबे, सुभाष पाटील, प्रशांत पाटील, संदीप पाटील, अमर निटुरे, नंदकुमार हसबे, प्रसाद बुडगे , विठ्ठल काटेवाड, राजकुमार सोनी, गौतम कांबळे, बळी मादळे, पाशा शेख, समीर पठाण दिलदार साकोळे, अमोल सूर्यवंशी, अक्षय पाटील यांच्यासह व्यापारी, ग्रामस्थ उपस्थित होते.