जळकोटातून जाणारा महामार्ग १०० फुट रुंदीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:01 AM2021-01-08T05:01:39+5:302021-01-08T05:01:39+5:30
जळकोट : जळकोट शहरातून महामार्गाचे काम सुरु असून, शहरातील हा मार्ग शंभर फूट रुंदीचा होणार आहे. मुख्य रस्ता ३० ...
जळकोट : जळकोट शहरातून महामार्गाचे काम सुरु असून, शहरातील हा मार्ग शंभर फूट रुंदीचा होणार आहे. मुख्य रस्ता ३० मीटर, दोन्ही बाजूला पाच-पाच फुटांचा सर्व्हिस रस्ता, दोन्ही बाजूला पाच-पाच फुटांच्या नाल्या व पाच फुटांचा खुला रस्ता राहणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी मंगळवारी तहसीलदार कार्यालयातील बैठकीत दिली.
जळकोट शहरात महामार्गाचे काम सुरु असून, याबाबत नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत असल्याने त्याची दखल घेत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायत, गुत्तेदार, महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीला तहसीलदार संदीप कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्गाचे विभागीय अभियंता प्रशांत भोसकर, महावितरणचे उपअभियंता शिवशंकर सावळे, अभियंता भोसले, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भरत राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी मेंगशेट्टी यांनी पोलीस ठाणे ते बीएसएनएल कार्यालयापर्यंतच्या कामाची पाहणी केली. या बैठकीत मेंगशेट्टी म्हणाले, शहराच्या मुख्य रस्त्याचे काम दर्जेदार करुन घ्यावे. महावितरणने आपली कामे आठ दिवसात पूर्ण करुन पुढील कामाला सुरुवात करावी. सर्व विभागांनी एकमेकांशी संवाद साधावा, त्यामुळे अडचणी येणार नाहीत. शहरातील नागरिकांनी शंभर फुटाच्या आत अतिक्रमण असेल तर स्वतःहून काढावे, असेही सांगितले.