ऐतिहासिक खजिना! उदगीरच्या किल्ल्यात दोन ट्रक तोफगोळ्यांसह ५ तोफाही सापडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 08:26 PM2022-05-03T20:26:19+5:302022-05-03T20:28:33+5:30
सन १७६० साली उदगीर येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. यात मराठ्यांचा विजय झाला.
- व्ही. एस. कुलकर्णी
उदगीर: येथील ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता करताना बुरुजाखाली असलेल्या गुहेत जवळपास दोन ट्रक एवढा तोफगोळा आणि पाच तोफा सापडल्या आहेत. पानिपतची लढाई सुरू होण्यापूर्वी उदगीर येथे निजाम आणि पेशव्यांमध्ये युद्ध झाले होते. यामुळे या किल्ल्यास मोठे महत्व असून हा साठा १४व्या किंवा १५ व्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हिंदू साम्राज्य महासंघ हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी सावळे,सोलापूरचे किशोर माने,उस्मानाबादचे नागेश जाधव औरंगाबादचे दत्तू हाडोळे यांच्यासह २६ जिल्ह्यातील ८० स्वयंसेवकांच्या पथकाने गेल्या चार दिवसांपासून उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या पथकाने स्वखर्चाने उदगीरला येवून किल्ल्यातील भिंतीवर वाढलेली झाडे ,झुडपे काढणे,किल्ल्यातील विहिरीचा गाळ काढून विहीर स्वच्छ करणे,गुहा स्वच्छ करणे,किल्ल्यातील भिंतीवर काढण्यात आलेली अश्लील चित्रे धुवून काढणे अशी कामे या पथकाकडून सुरू आहेत.
दरम्यान, सोमवारी किल्ल्यातील बुरुजाखालील गुहेची स्वच्छता सुरू असताना जवळपास दोन ट्रकहून अधिक शिवकालीन तोफगोळा साठा आणि पाच तोफाही या पथकाला आढळून आल्या. या पथकाला सतीश उस्तुरे, प्रशांत मांगुळकर, विहिंपचे सतीश पाटील,सावन टांकसाळे, डॉ.प्रशांत राजूरकर रामचंद्र चव्हाण, अरविंद शिंदे यांनी सहकार्य केले.
चौदाव्या-पंधराव्या शतकातील तोफगोळा--
सन १७६० साली उदगीर येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. यात मराठ्यांचा विजय झाला. मराठ्यांचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी आपले सैन्य घेवून पानिपतकडे कूच केली. पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीरपासून झाल्यामुळे येथील लढाईस ऐतिहासिक महत्व आहे. या किल्ल्यात आढळून आलेला तोफगोळा हा चौदाव्या किंवा पंधराव्या शतकातील असावा असा अंदाज या पथकाचे प्रमुख शिवाजी पवार यांनी वर्तवला आहे.
२६ जिल्ह्यातून ८० स्वयंसेवक
हिंदू साम्राज्य महासंघ हिंदुस्थानचे अध्यक्ष शिवाजी पवार व बनशेळकी(ता. उदगीर)चे कार्यकर्ते शिवाजी सावळे यांची रायगडावर भेट झाली. उदगीरच्या किल्ल्याविषयी सावळे यांनी पवार यांना माहिती दिली. त्यामुळे राज्यातील २६ जिल्ह्यातील ८० स्वयंसेवक उदगीरच्या किल्ल्याच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले. असे शिवाजी पवार लोकमतशी बोलताना म्हणाले.