लातूर शहरात हिट अॅण्ड रन: भरधाव ट्रकचालकाचा थरार; संतप्त जमावाने दिला चाेप
By राजकुमार जोंधळे | Updated: December 25, 2024 21:20 IST2024-12-25T21:19:53+5:302024-12-25T21:20:03+5:30
अनेक वाहनांना दिली धडक : संतप्त जमावाने ट्रकचालाकाला दिला चाेप, पाेलिसांनी चालकासह ट्रक घेतला ताब्यात.

लातूर शहरात हिट अॅण्ड रन: भरधाव ट्रकचालकाचा थरार; संतप्त जमावाने दिला चाेप
राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील नवीन नांदेड नाका रिंगराेडसह गावभागातील पटेल चाैक परिसरात एका भरधाव ट्रकचालकाने अनेक वाहनधारकांना धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. ही थरारक घटना अनेकांच्या उरात धडकी भरविणारी हाेती. अखेर पटेल चाैकातील नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून चाेप दिला. घटनास्थळी दाखल झालेल्या गांधी चाैक पाेलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून, याबाबत पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पाेलिसांनी सांगितले, गोरोबा बापूराव पोतवळे (वय २८, रा. महापूर ता.जि.लातूर) या ट्रकचालकाने आपल्या ताब्यातील ट्रक (एम.एच. २५ यू २६१२) भरधावपणे चालवून बुधवारी दुपारी नवीन नांदेड नाका परिसरातील जयनगर परिसरातील काही वाहनधारकांना जाेराची धडक दिली. यामध्ये काही वाहनाचे माेठे नुकसान झाले. हा ट्रकचालक वाहन भरधावपणे चालवत रिंगराेड परिसरातून गावभागात आला. दरम्यान, पटेल चाैकातही या ट्रकचालकाने अनेक वाहनांना उडवले. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले. घडलेल्या थरारक घटनेनंतर भेदरलेल्या स्थानिक नागरिकांनी पाेलिसांनी माहिती दिली. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या पाेलिसांनी संतप्त जमावाला पांगवत ट्रकचालकाला ताब्यात घेतले.
संतप्त नागरिक म्हणाले, ट्रकचालकाला ताब्यात द्या...
पटेल चाैकात घटनेनंतर माेठा जमाव जमला. काहींनी ट्रकचालकाला ताब्यात घेत चाेप दिला. यावेळी दाखल झालेल्या पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळी जमलेल्या स्थानिक संतप्त नागरिकांनी ट्रकचालकाला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. पाेलिसांनी त्यास व्हॅनमधून गांधी चाैक ठाण्यात आणले.
स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखविले अन् जीवितहानी टळली...
लातुरातील नवीन नांदेड नाका रिंग राेड परिसरासह गावभागातील पटेल चाैक परिसरात ट्रकचालकाने घतालेल्या धुमाकुळानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत ट्रकचालकाला पकडले. काही संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चाेप दिला. यावेळी नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली आहे. या थरारर घटनेने अनेक प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर काटा उभा राहिला.
पाच नागरिक जखमी; वाहनांचेही झाले नुकसान...
रिंगराेड, सिद्धेश्वर चाैक परिसरासह गावभागातील पटेल चाैकात भरधावपणे आलेल्या ट्रकचालकाने चार ते पाच वाहनांना जाेराने उडवले असून, यात दुचाकीचालकासह इतर काही जण जखमी झाले आहेत. यातील काहींना शासकीय रुग्णालयात तर काही जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.