बेशिस्त वाहनधारकांना झटका; ५३८९ चालकांकडून ३२ लाखांचा दंड वसूल
By राजकुमार जोंधळे | Published: March 1, 2023 06:52 PM2023-03-01T18:52:28+5:302023-03-01T18:55:03+5:30
वाहनांवर यापूर्वी ऑनलाइन दंड करण्यात आले असून, ज्यांनी दंड भरला नाही, अशांना वारंवार नाेटीस, एसएमएस पाठविण्यात आले हाेते.
लातूर : शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, वाहतुकीचे नियम माेडणाऱ्या १ हजार ६०० वाहनधारकांना चांगला झटका दिला आहे. पाेलिसांनी फेब्रुवारीमध्ये तब्बल ११ लाख ६८ हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. ज्यांच्याकडे पूर्वीचा दंड थकला आहे, अशा तब्बल ५ हजार ३८९ चालकांकडून ३१ लाख २९ हजारांचा दंड वसूल केला आहे.
लातूर शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतुकीचे नियम माेडणाऱ्यांमुळे वाहतुकीचा खाेळंबा हाेत आहे. त्यांना शिस्त लावण्यासाठी कायदेशीर कारवाई केली जात आहे. वाहतुकीचे नियम माेडणे अनेकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. लातुरात सण-उत्सव आणि विद्यार्थांच्या परीक्षा काळात वाहतुकीची काेंडी हाेत असल्याचे समाेर आले आहे. लातुरातील प्रमुख रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत आहे. शहरात वाहतुकीचा खोळंबा हाेणार नाही, यासाठी पाेलिसांकडून चौकामध्ये पायी पेट्रोलिंग सुरु केली आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
केंद्रीय माेटार वाहन कायद्यानुसार कारवाई...
केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. चालक परवाना, वाहनाची कागदपत्रे तपासली जात आहेत. शिवाय, वाहन चालविण्याचा परवाना, कागदपत्र सोबत न ठेवणे, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरणे, मोबाईलवर बाेलत वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
१५४१ वाहनांवर खटले; १२ लाखांचा केला दंड...
वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कदम, पोउपनि. आयुब शेख, आवेज काझी यांच्यासह पथकाने फेब्रुवारी महिन्यात अवैध प्रवासी वाहतूक, सायलेन्सर, कर्कश हॉर्न, काळी-पिवळी टॅक्सी, फॅन्सी नंबर प्लेट, विना नंबर प्लेट, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशा, नो पार्किंग, मोठ्या आवाजाचे मॉडीफाय सायलेन्सर असलेल्या तब्बल १५४१ चालकांवर खटले दाखल केले असून, त्यांना ११ लाख ६८ हजार ६५० रुपयांचा दंड केला आहे.
दंडाची रक्कम न भरणाऱ्यांवर कारवाई...
वाहनांवर यापूर्वी ऑनलाइन दंड करण्यात आले असून, ज्यांनी दंड भरला नाही, अशांना वारंवार नाेटीस, एसएमएस पाठविण्यात आले हाेते. दरम्यान, ज्यांनी दंड भरला नाही, अशांवर कारवाई केली जात आहे. ५ हजार ३८९ चालकांकडे थकलेला ३१ लाख २९ हजारांचा दंड वसूल केला आहे.