मनपा कर्मचाऱ्यांच्या गृहभेटी; अबेटिंग मोहिमेचा तिसरा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:53+5:302021-09-03T04:20:53+5:30
लातूर : डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यासाठी तसेच डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने अबेटिंग मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ...
लातूर : डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यासाठी तसेच डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने अबेटिंग मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन पाणीसाठे तपासले जात आहेत. या मोहिमेचा तिसरा दिवस असून, या तीन दिवसांत २८ हजार ५०४ घरांना भेटी दिल्या आहेत. बुधवारी शहरात एका दिवसात १३ हजार ६१० घरांना भेटी दिल्या असून, डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट केली आहेत.
लातूर शहरात मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती झाली आहे. त्यामुळे डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले आहेत. खासगी रुग्णालयासह सरकारी रुग्णालयांमध्ये डेंग्यू आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दवाखान्यात दाखल आहेत. गेल्या आठवड्यात लातूर शहरामध्ये ४६ डेंग्यू संशयित रुग्ण आढळले होते तर या आठवड्यात ४७ डेंग्यू संशयित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मनपाचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून, डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यासाठी गृहभेटी सुरू केल्या आहेत. शहरात गेल्या तीन दिवसांपासून नरसिंह नगर, सुभेदार रामजी नगर, टाके नगर, नेताजी नगर, विशाल नगर, खोरी गल्ली, इंडिया नगर, व्यंकटेश नगर, मोती नगर, हमाल गल्ली, कॉईल नगर, कापड मिल नगर, होळकर नगर, संजय नगर, गवळी नगर, खडक हनुमान, साळे गल्ली, आदम नगर, इंदिरा नगर, जय भीम नगर, तुळजाभवानी नगर, प्रकाश नगर, गौतम नगर, कपिल नगर, खाडगाव रोड, क्रांती नगर, सद्गुरु नगर, सुशिलादेवी नगर, नारायण नगर, भाग्य नगर, हाके नगर या भागात अबेटिंग करण्यात आले आहे.
तापाच्या रुग्णांमध्ये वाढ....
डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहेत. सरकारीसह खासगी रुग्णालये या रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला अशा लक्षणांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सुदैवाने जिल्ह्यात कोरोना कमी झाला असला तरी डेंग्यूने डोके वर काढले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गृहभेटीची मोहीम सुरू केली आहे. या गृहभेटीत रुग्णांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. स्वच्छतेबरोबर रुग्ण नोंदी घेतल्या जात असल्याने डाटा संकलित होत आहे.