गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचा गौरव, राज्यात प्रथमच लातूरच्या स्त्री रुग्णालयास राष्ट्रीय मानांकन

By हरी मोकाशे | Published: July 22, 2024 07:20 PM2024-07-22T19:20:10+5:302024-07-22T19:20:44+5:30

लक्ष्य आणि मुस्कान कार्यक्रमात प्राविण्य मिळविण्यासाठी डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची पावती

Honoring quality healthcare, Latur's Women's Hospital for the first time in the state has been awarded a national rating | गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचा गौरव, राज्यात प्रथमच लातूरच्या स्त्री रुग्णालयास राष्ट्रीय मानांकन

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचा गौरव, राज्यात प्रथमच लातूरच्या स्त्री रुग्णालयास राष्ट्रीय मानांकन

लातूर : रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी म्हणून शासनाच्या वतीने लक्ष्य आणि मुस्कान उपक्रम राबविण्यात येतो. याअंतर्गत शहरातील स्त्री रुग्णालयास राष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळाले आहे. विशेषत: राज्यात प्रथमच लातूरच्या स्त्री रुग्णालयाच्या सेवेचा गौरव होत आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातील सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी म्हणून एनकॉस उपक्रम राबविण्यात येतो. त्याच धर्तीवर सन २०१७ मध्ये लक्ष आणि २०२१ मध्ये मुस्कान कार्यक्रमास सुरुवात झाली. लक्ष्य कार्यक्रमाअंतर्गत शहरातील स्त्री रुग्णालयातील लेबर रुम आणि मातृत्व शस्त्रक्रियागृह तसेच मुस्कानअंतर्गत विशेष नवजात शिशू देखभाल केंद्र (एसएनसीयू) आणि पोषण पुनर्वसन केंद्राची (एनआरसी) २५ ते २६ एप्रिल रोजी केंद्रीय पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. त्यामुळे निकालाकडे लक्ष लागून होते. सोमवारी स्त्री रुग्णालयास मानांकन मिळाले आहे.

बालरोग व सेवासंदर्भात मार्गदर्शन...
लक्ष कार्यक्रमाअंतर्गत प्रीटरम, रक्तस्त्राव, प्युअरपेरल सेप्सिस, नवजात श्वासोच्छवास आणि नवजात सेप्सिस आदींमुळे माता व नवजात अर्भकातील विकृती आणि मृत्यू कमी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच मुस्कानअंतर्गत जन्मापासून ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी दर्जेदार बाल अनुकुल सेवांची तरतूद आहे. तसेच टाळता येण्याजोगे नवजात आणि बालरोग व बालमृत्यू कमी करण्यासाठी मार्गदर्शन देण्यात आले आहे.

६ लाखांचे पारितोषिक...
लक्ष्य कार्यक्रमाअंतर्गत लेबर रुमसाठी ३ लाख आणि मातृत्व शस्त्रक्रियागृहासाठी तीन लाख असे एकूण सहा लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. या बक्षीसाच्या रकमेचा उपयोग आरोग्यसेवेसाठी होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन...
राष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील स्त्री रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी तयारी केली होती. त्यांना निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, डॉ. एस.जी. पाठक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र भालेराव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. कापसे, जिल्हा गुणवत्ता नियमन समन्वयक डॉ. पी.ए. रेड्डी यांचे सहकार्य लाभले.

आणखीन दर्जेदार सेवा देऊ...
लक्ष्य आणि मुस्कान कार्यक्रमात प्राविण्य मिळविण्यासाठी डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यामुळे राज्यात प्रथमच स्त्री रुग्णालयाचा गौरव होत असल्याचा सर्वाधिक आनंद आहे. या मानांकनामुळे जबाबदारी आणखीन वाढली असून अधिकाधिक दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.
- डॉ. रवींद्र भालेराव, वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय.

Web Title: Honoring quality healthcare, Latur's Women's Hospital for the first time in the state has been awarded a national rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.