सहा वर्षांपूर्वी सन्मान; आता आगाऊ वेतनवाढ, दहा आदर्श ग्रामसेवकांमध्ये आनंद
By हरी मोकाशे | Published: February 21, 2024 09:11 PM2024-02-21T21:11:28+5:302024-02-21T21:12:08+5:30
...सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वेतनवाढ देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.
लातूर : गाव पातळीवर उत्कृष्ट कार्य केल्याने सन २०१६- १७ मध्ये आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र, एक आगाऊ वेतनवाढ देण्यात आली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील दहा आदर्श ग्रामसेवकांचे वेतनवाढीकडे लक्ष लागून होते. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वेतनवाढ देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील गावच्या विकासात ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असते. गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे कार्य करीत असतो. गावच्या विकास प्रक्रियेतील तो महत्त्वाचा घटक ठरतो. ग्रामपंचायतीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि कामकाज करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने तालुका आणि जिल्हा पातळीवर आदर्श ग्रामसेवकांची निवड करुन सन्मानित करण्यात येते. सन २०१७ पूर्वीच्या आदर्श ग्रामसेवकांना सन्मानाबरोबर एक आगाऊ वेतनवाढ देण्यात येत होती.
२०१६-१७ च्या ग्रामसेवकांना लाभ...
सन २०१६-१७ मध्ये तालुकास्तरावर आदर्श ग्रामसेवक म्हणून आर.बी. भारती, गजानन ढोले, बी.डी. आमले, एस.एम. एकोर्गे, एस.डी. पताळे, व्ही.व्ही. दाडगे, ए.डी. रोकडे, आर.एन. परचंडराव, एस.जी. गिरी, व्ही.व्ही. बेंडले यांची निवड झाली होती. त्यामुळे या ग्रामसेवकांचा सन्मान करण्यात आला होता. मात्र, एक आगाऊ वेतनवाढ राहिली होती.
तांत्रिक अडचणींमुळे रखडला होता प्रश्न...
काही तांत्रिक अडचणींमुळे एक आगाऊ वेतनवाढ देण्यात आली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील दहा आदर्श ग्रामसेवकांचे लक्ष लागून होते. परिणामी नाराजी व्यक्त होत होती. वेतनवाढीच्या आदेशामुळे वेतनात मासिक दीड ते दोन हजार रुपयांची वाढ होणार आहे. विशेष म्हणजे ही वेतनवाढ ऑक्टोबर २०१७ पासून देण्यात येत आहे.
वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात मंजूर...
सन २०१६-१७ मधील आदर्श ग्रामसेवकांची एक आगाऊ वेतनवाढ तांत्रिक अडचणींमुळे राहिली होती. त्यासंदर्भात शासनाच्या अधिन राहून सीईओ अनमोल सागर यांनी एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात मंजुरीस मान्यता दिली आहे. शासनाचे मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर आणि लेखा आक्षेपमध्ये वसुलीबाबत अभिप्राय रद्द झाल्यास हा आदेश रद्द होईल.
- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.