कर्णकर्कश्य हॉर्न, सायलेन्सरच्या विरोधात वाहतूक शाखेचा कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:36 AM2021-02-21T04:36:58+5:302021-02-21T04:36:58+5:30
लातूर - मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनाला हॉर्न असणे आवश्यक आहे. पण हॉर्न कुठे आणि किती वाजवावा याचाही नियम ...
लातूर - मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनाला हॉर्न असणे आवश्यक आहे. पण हॉर्न कुठे आणि किती वाजवावा याचाही नियम ठरवून दिला आहे. याबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावण्याची तरतूद आहे. मात्र, शहरात कर्णकर्कश्य हॉर्न, सायलेन्सरचे प्रमाण वाढत आहेत. याचा त्रास रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. परिणामी, शहर वाहतूक शाखेच्या वतीने कर्णकर्कश्य हॉर्न आणि सायलेन्सरच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, आतापर्यंत १ हजार १५० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.समोरच्या व्यक्तीला सावध करण्यासाठी प्रामुख्याने हॉर्नचा वापर केला जाते. वाहनाच्या प्रकारानुसार हॉर्नचा आवाज किती असावा, तो कसा असावा याबाबत नियम ठरवून दिले आहेत. या नियमांचे बहुतांश वाहनधारक पालन करतात. मात्र काही जण आपल्या वाहनाला विचित्र आवाज येईल, अशा प्रकारचे हॉर्न आणि सायलेन्सर लावतात. कर्णककर्श हॉर्न व फटाके फोडणारे सायलेन्सर असलेल्या वाहनांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यावर पर्याय म्हणून शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील प्रत्येक चौकात विशेष मोहीम राबवित कर्णकर्कश्य हॉर्न आणि सायलेन्सर असलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविली आहे. गेल्या काही दिवसांत १ हजार १५० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून कर्णकर्शक हॉर्नसाठी ५०० तर सायलेन्सरसाठी १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. आगामी काळातही ही मोहीम राबविली जाणार असून, नियमांचे उल्लंघन घेल्यास वेळप्रसंगी गुन्हेही दाखल केले जाणार असल्याचे शहर वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.
तर गुन्हे दाखल करणार...
कर्णकर्कश्य हॉर्न, सायलेन्सर बसविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाया केल्या जात आहेत. मर्यादेपेक्षा अधिक आवाज असणाऱ्या वाहनचालकांना दंड करण्यात येतो. सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या वाहनचालकांना सायलेन्सर बसवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कर्णकर्कश्य सायलेन्सर असलेल्या ११५० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. सुधारणा न झाल्यास गुन्हेही दाखल केले जाणार आहेत. शंकर पटवारी पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
आतापर्यंत ११५० जणांवर कारवाई...
कर्णकर्कश्य हॉर्न आणि सायलेन्सर बसविलेल्या सुमारे १ हजाराहून अधिक वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. या वाहचालकांकडून सायलेन्सरसाठी १ हजार तर कर्णकर्कश्य हॉर्नसाठी ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
काय कारवाई होऊ शकते...
परिवहन विभागाने वाहनांच्या हॉर्नची मर्यादा घालून दिली आहे. तीव्र आवाज असणाऱ्या वाहनचालकांकडून दंड आकारला जात आहे. तसेच हॉर्न बदलून घेण्याबाबत सूचित केले जाते. दंडात्मक कारवाई केल्या जात असून, शहरातील विविध चौकात तपासणीसाठी पथके तैनात आहेत.