लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अश्व दौड स्पर्धा, अंबाजोगाईचा बुलेट, बेलकुंडचा बाहुबली ठरला विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:13 PM2022-03-21T23:13:53+5:302022-03-21T23:15:07+5:30

आज तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त अश्व दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Horse race for the first time in Latur district, Ambajogai's bullet, Belkund's Bahubali is winner | लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अश्व दौड स्पर्धा, अंबाजोगाईचा बुलेट, बेलकुंडचा बाहुबली ठरला विजेता

लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अश्व दौड स्पर्धा, अंबाजोगाईचा बुलेट, बेलकुंडचा बाहुबली ठरला विजेता

Next

लातूर- औसा तालुक्यातील बेलकुंड येथे सोमवारी पहिल्यांदाच अश्व दौड स्पर्धा पार पडली. यावेळी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळाला. अश्व दौड पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच मराठवाडा व सीमावर्ती भागातील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. वाऱ्याच्या वेगात आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या स्पर्धेत मोठ्या गटात अंबाजोगाईच्या हुसेन गवळी यांच्या बुलेटने, तर लहान गटात बेलकुंडमधील विष्णू कोळी यांच्या बाहुबली घोड्याने प्रथम क्रमांक मिळविला.

आज तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त अश्व दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बेलकुंड गावाशेजारील पाटील कुटुंबियांच्या शेतात स्पर्धेसाठी मैदान तयार करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण ३५ अश्वांचा सहभाग होता. स्पर्धेसाठी ५०० मीटरचे दोन ट्रॅक होते. लहान व मोठ्या गटात प्रत्येकी चार फेऱ्या झाल्या. प्रारंभी चाचणी फेरी होऊन अंतिम फेरीसाठी दोन्ही गटातून प्रत्येकी सात अश्व निवडण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन छावा संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, भगवान माकणे, योगीराज पाटील, श्रीकांत सूर्यवंशी, नगरसेवक अजय कोकाटे, गौरव काथवटे, सुधीर पोतदार, भीमराव शिंदे, दिगंबर पाटील, सिध्दाजी जगताप, डॉ. हिरालाल लिंबाळकर यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण प्रवीण कोपरकर, धनराज लोखंडे, सरपंच विष्णू कोळी, अनिल कोळी, यांच्या हस्ते झाले. पंच म्हणून माऊली बीडकर, बालाजी माने, राजेंद्र पाटील, धनू काझी, कुमार बचाटे आदींनी काम पाहिले.

यावेळी स्पर्धा समितीचे अध्यक्ष विलास मुकडे, सचिव अमित सोलापूरे, बालेखाँ पठाण, खंडू उबाळे, नागनाथ कोडे, श्रीमंत पाटील, श्रीशैल्य पाटील, किशोर लांडगे, शिवराज मुकडे, चैतन्य पाटील, दीपक वळके, बालाजी मुकडे, सखाराम पाटील, रघुवीर कोळी, आमिर पठाण आदी उपस्थित होते.

मोठ्या गटात द्वितीय बक्षीस परभणीच्या वसीम अन्सारी यांच्या जासुसने तर तृतीय बक्षीस लातूरच्या सुलतान खोरीवाले यांच्या हिरो घोड्याने मिळविले. लहान गटात द्वितीय क्रमांक अहमदपूरच्या सय्यद अफजल खैराती यांच्या वीर घोड्याने तर तृतीय क्रमांक शाहजान खोरीवाले यांच्या टायगरने पटकाविला. अश्व प्रदर्शनात गौरव काथवटे यांच्या घोड्याने प्रथम, योगीराज पाटील यांचा अश्व द्वितीय तर गोविंद गाढवे यांच्या घोड्याने तृतीय क्रमांक पटकावला.

Web Title: Horse race for the first time in Latur district, Ambajogai's bullet, Belkund's Bahubali is winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर