अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत यजमान नांदेड विद्यापीठाची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:11 PM2018-11-01T12:11:07+5:302018-11-01T12:19:40+5:30
बुधवारपासून सुरू झालेल्या मुलांच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत यजमान नांदेड विद्यापीठाने विजयी सलामी दिली.
लातूर : नांदेडचे स्वारातीम विद्यापीठ व लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारपासून सुरू झालेल्या मुलांच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत यजमान नांदेड विद्यापीठाने विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत देशभरातील ५५ विद्यापीठांतील ८०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेचे उद्घाटन महापौर सुरेश पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनपाचे स्थायी समितीचे सभापती अॅड. शैलेश गोजमगुंडे, क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, राष्ट्रीय क्रीडा शास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप देशमुख, संस्था सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, उपाध्यक्ष डॉ.पी. आर. देशमुख, गोपाळ शिंदे, प्रशांत जगताप, सिंकूकुमार सिंह, बी.ए. मैंदर्गे, अजय दुडिले, बालाजी होळके यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी केले. या स्पर्धा संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलसह नवोदय विद्यालय व ज्ञानेश्वर नगर अशा तीन मैदानांवर होत आहेत. यशस्वितेसाठी प्रा.डॉ. अनिरुद्ध बिराजदार, मुजिब हसन, साजिद पठाण, सुरेश देशमुख, आनंद भोसले आदी परिश्रम घेत आहेत.
दोन्ही लढती एकतर्फी जिंकल्या
यजमान नांदेड विद्यापीठाने पहिल्या फेरीत गोंडवना विद्यापीठ गडचिरोलीचा १० रनांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यातही भोपाळ विद्यापीठाला १० रनांनी लोळविले. दुसऱ्या सामन्यात नागपूर विद्यापीठाने जिंद विद्यापीठाचा ७ रनांनी पराभव केला. अमरावती विद्यापीठाने कोटा विद्यापीठाचा १२-१ ने पराभव केला. रायपूर विद्यापीठाने भोपाळ विद्यापीठाचा एकतर्फी पराभव केला. अजमेर विद्यापीठाने पाटण विद्यापीठाचा ११-५ ने एकतर्फी पराभव केला. दुपारच्या सत्रात कोल्हापूरने मेंगलोरचा, औरंगाबादच्या बामु विद्यापीठाने अनंतपुरम विद्यापीठाचा तर जम्मू विद्यापीठाने बिलासपूर विद्यापीठाचा एकतर्फी पराभव केला. या स्पर्धा साखळी पद्धतीत चार गटांत होत असून, यातून विजेता ठरेल.
उत्कृष्ट खेळाडू मिळतील...
अध्यक्षीय भाषणात माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील म्हणाले, शाहू महाविद्यालयाने यापूर्वी अनेक राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या आहेत. अशा स्पर्धेच्या माध्यमातूनच देशाला उत्कृष्ट खेळाडू मिळतील. यावेळी महापौर सुरेश पवार यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले.