'मे' पेक्षा 'जून' अधिक तापदायक; वरुणराजाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती
By हरी मोकाशे | Published: June 21, 2023 05:36 PM2023-06-21T17:36:56+5:302023-06-21T17:38:29+5:30
मृग नक्षत्र निघाल्यानंतर सर्वांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, तो संपत आला तरी अद्यापही पावसाने हजेरीही लावली नाही.
लातूर : मृग नक्षत्र संपत आले तरी अद्याप वरुणराजाची बरसात नाही. पावसाळ्याच्या दिवसांत मे महिन्यापेक्षा अधिक तीव्र उन्हं जाणवत आहे. परिणामी, जलसाठे आटत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा वाढल्या आहेत. दोन आठवड्यांच्या कालावधीत आणखीन २१ गावे तहानेने व्याकूळ झाली आहेत. सध्या जिल्ह्यातील १२३ गावांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून अधिक उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य होणार असा अंदाज व्यक्त होत होता. रविराजाने रौद्ररूप धारण केल्याने मे महिन्यात अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. त्यामुळे पावसाळा कधी सुरू होईल आणि वरुणराजा कधी बरसेल याकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. तीव्र उन्हामुळे जलसाठे आटू लागले होते तर जलस्त्रोत कोरडे पडू लागले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा वाढल्या.
मृग नक्षत्र निघाल्यानंतर सर्वांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, तो संपत आला तरी अद्यापही पावसाने हजेरीही लावली नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शिवाय, पाणीटंचाईचे चटके वाढले आहेत. सध्या जिल्ह्यातील १२३ गावांत पाणीटंचाई जाणवत असून, त्यातील १०३ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक चटके...
जिल्ह्यातील १२३ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. त्यात सर्वाधिक टंचाई अहमदपूर तालुक्यात आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून १०३ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
२० गावांतील नागरिक हैराण...
१२३ पैकी १०३ गावांत अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, अद्यापही २० गावांत अधिग्रहण सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे तेथील अबालवृद्धांना भरउन्हात पायपीट करीत पाणी आणावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. या गावांत तात्काळ पाणीपुरवठ्याची मागणी होत आहे.
अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेली गावे...
तालुका गावे
लातूर ०५
औसा ३१
निलंगा ०४
रेणापूर ०६
अहमदपूर ३९
चाकूर ०७
शिरूर अनंत. ००
उदगीर ०६
देवणी ००
जळकोट ०५
देवणी, शिरूर अनंतपाळ टंचाईमुक्त...
जिल्ह्यातील देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एकाही गावास पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत अद्याप एकही अधिग्रहण करण्यात आलेले नाही. अहमदपूर तालुक्याच्या पाठोपाठ औसा तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे. तिथे ३४ गावांत पाणीटंचाई असून, सध्या अधिग्रहणाद्वारे ३१ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
टंचाईच्या झळा वाढल्या...
एप्रिलच्या अखेरीस जिल्ह्यातील ३० गावांत पाणीटंचाई जाणवत होती. तेव्हा १५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मे महिन्यात टंचाई वाढून ती ८५ गावांना जाणवत होती. ६२ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात १०२ गावे टंचाईने त्रस्त झाली. ९० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती.