असाही झाला डाव.. शिष्य झाला जावई..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:01 AM2021-01-08T05:01:19+5:302021-01-08T05:01:19+5:30
लातूर : कुस्तीगुरू महाबली सतपालसिंग व ऑलिम्पिकपदक विजेता सुशीलकुमार ही गुरु-शिष्याची जोडी कालांतराने सासरे-जावयांची जोडी झाली. भारतीय कुस्तीने हा ...
लातूर : कुस्तीगुरू महाबली सतपालसिंग व ऑलिम्पिकपदक विजेता सुशीलकुमार ही गुरु-शिष्याची जोडी कालांतराने सासरे-जावयांची जोडी झाली. भारतीय कुस्तीने हा सुवर्णक्षण अनुभवला. याच प्रकारे महाराष्ट्राच्या कुस्तीतही असा दुर्मीळ योग आला, तो म्हणजे अर्जुनवीर काका पवार व शिष्य राष्ट्रकुल सुवर्ण विजेता राहुल आवारे यांचा. गुरू-शिष्याच्या या जोडीने आपले हे नाते अधिक घट्ट करीत नातेसंबंधात परावर्तित केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीत असा योग पाहावयास मिळाला. तब्बल ११ वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करीत अर्जुनवीर काका पवार यांनी अनेक वेळा भारताला पदके मिळवून दिली. महाराष्ट्राची कुस्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे काका पवार नामवंत मल्ल. कुस्ती सोडल्यानंतरही त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारत राज्यात अनेक उदयोन्मुख मल्ल घडविले. रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामांच्या निधनानंतर बीड जिल्ह्यातील पाटोद्याचा तुफानी मल्ल राहुल आवारे काकांच्या तालमीत आला. त्यानंतर या गुरू-शिष्यांच्या जोडीने अनेक चमत्कार घडविले. २०१८ साली राष्ट्रकुल स्पर्धेत राहुलने सुवर्णपदक पटकाविले होते, तसेच २००९ व २०११ च्या आशियाई स्पर्धेत त्याने भारतासाठी ब्रांझ पदक पटकाविले. राष्ट्रीय स्पर्धेतही फ्री स्टाइल प्रकारात पाच वेळा सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे ही जोडी हिट ठरली. कालांतराने गुरु-शिष्यांचे नाते हे नात्यात परावर्तित झाले. डीवायएसपी राहुल आवारे यांचा ९ ऑक्टोबर २०२० रोजी साखरपुडा झाला होता. कोरोनामुळे विवाहाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ३ जानेवारी २०२१ रोजी पुण्यात राहुल आवारे व ऐश्वर्या पवार हे एका शाही कार्यक्रमात विवाहबद्ध झाले.
दुर्मीळ योगायोग...
महाबली सतपालसिंग व ऑलिम्पिकपदक विजेता मल्ल सुशीलकुमार या गुरू-शिष्याची जोडी नात्यात परावर्तित झाली. या दोघांनाही केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्याच पद्धतीने गुरुवर्य काका पवार व राष्ट्रकुल विजेता राहुल आवारे यांनाही केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे भारतीय कुस्तीत पद्मश्री पुरस्कारानंतर अर्जुन पुरस्काराचे ही सासरे-जावयांची जोडी चर्चेचा विषय ठरली आहे.
लातूरच्या कुस्तीत नव्या नात्याची चर्चा...
काका पवार, राहुल आवारे हे गुरू-शिष्य नात्यात परावर्तित झाले. याचा महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आनंद तर झालाच, शिवाय, मूळचे लातूर जिल्ह्यातील साई गावचे असणारे काका पवार यांच्याही जिल्ह्यात या नवीन नात्याची चर्चा रंगली.
ऑलिम्पिक खेळविण्याचे लक्ष्य...
माझा शिष्य राहुल हा माझा जावई झाल्याचा आनंद आहेच. मात्र, याउपर त्याच्याकडून उत्तम कामगिरी करून घेत त्याला ऑलिम्पिक खेळविण्याचे लक्ष्य असल्याचे अर्जुनवीर काका पवार यांनी सांगितले.