सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश कसे होणार? मनासारखे काॅलेज मिळविण्यासाठी कसरत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:23 AM2021-08-13T04:23:48+5:302021-08-13T04:23:48+5:30
लातूर : न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द केल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावी वर्गात प्रवेश होणार आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नोंदणी करावी लागणार ...
लातूर : न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द केल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावी वर्गात प्रवेश होणार आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नोंदणी करावी लागणार असून, त्यानंतर मेरिटनुसार यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप महाविद्यालयांना सूचना केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवेश कसे होणार, मनासारखे कॉलेज मिळणार का, असा प्रश्न पालक, विद्यार्थ्यांना पडला आहे.
लातूर जिल्ह्यात २३४ कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या असून, यामध्ये ४१ हजार ४० जागा आहेत, तर यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४० हजार २८१ आहे. यातील काही विद्यार्थी आयटीआय, तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाकडे जाणारे आहेत. त्यामुळे सर्वच जागांवर प्रवेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाने सीईटी रद्द करून तीन दिवस होत आले असले तरी शिक्षण विभागाने अद्याप प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या - ४०,२८१
अकरावी प्रवेश क्षमता - ४१,०४०
शाखानिहाय जागा...
कला - १६,२००
विज्ञान - १७,६४०
वाणिज्य - ५,०४०
महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार
लातूर शहरातील महाविद्यालयांमध्ये दरवर्षी गुणवत्ता यादीनुसारच अकरावीच्या वर्गात प्रवेश दिले जातात. यंदा जिल्ह्यातील ६६१ पैकी ६५२ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. त्यामध्ये १९७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल राहणार आहे. परिणामी, महाविद्यालयांचा प्रवेशाचा कटऑफ वाढणार आहे.
आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशाची...
दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे. अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द झाली असल्याने राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने प्रवेशासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर होतील. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे.
-प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे
दरवर्षी मेरिटनुसार अकरावी वर्गात प्रवेश दिले जातात. यावर्षी कोरोनामुळे दहावीची परीक्षा घेण्यात आली नाही. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर झाला. मात्र, अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया कशी होणार याबाबत राज्य शासनाकडून निर्देश येतील. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाला गती मिळेल.
-प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे
विद्यार्थी, पालकांत संभ्रम...
दहावीचा निकाल जाहीर होऊन १५ दिवस झाले आहेत. सीईटीची पूर्ण तयारी केली होती. मात्र, परीक्षा रद्द झाल्याने आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश कसा मिळणार, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे शासनाने प्रवेश प्रक्रियेची नियमावली लवकर जाहीर करावी. -प्रशांत आयरेकर, विद्यार्थी
सीईटीच्या गुणांवर प्रवेश मिळणार होता. मात्र, न्यायालयाने परीक्षाच रद्द केली. त्यामुळे प्रवेश कसा होणार याबाबत माहिती मिळालेली नाही. शासनाने तात्काळ मार्गदर्शक सूचना जाहीर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. यंदा अंतर्गत मूल्यमापन झालेले असल्याने महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार आहे.
-नम्रता थडकर, विद्यार्थिनी