उन्हाळ्यात पाण्याचे कसे होणार? लातूरात ५ मध्यम प्रकल्पांत शिल्लक राहिला १२ टक्के जलसाठा!
By हरी मोकाशे | Published: February 28, 2024 06:44 PM2024-02-28T18:44:31+5:302024-02-28T18:44:56+5:30
गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने परतीच्या पावसावर आशा होती. परंतु, तीही फोल ठरली.
लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने आणि दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईची दाहकता अधिक गडद होऊ लागली आहे. जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत तर पाच प्रकल्पांमध्ये केवळ १२.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचे कसे होणार? अशी चिंता ग्रामीण भागातील नागरिकांना लागली आहे.
गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने परतीच्या पावसावर आशा होती. परंतु, तीही फोल ठरली. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे-नाले वाहिले नाहीत. परिणामी, मध्यम, लघु प्रकल्पांत अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासून पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले. आगामी काळात पाणीटंचाई आणखीन तीव्र होण्याची भीती व्यक्त करत जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी उपाययाेजनात्मक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच प्रकल्पातील पाणी आरक्षित केले आहे. फेब्रुवारीत पाणीटंचाई वाढली आहे.
जिल्ह्यातील ११८ गावे-वाड्या तहानल्या...
तालुका - टंचाईग्रस्त गावे
लातूर - १७
औसा - ३०
निलंगा - १४
अहमदपूर - ३७
चाकूर - ०२
शिरूर अनं. - ०३
उदगीर - ०३
देवणी - ०२
एकूण - ११८
२५ गावांना अधिग्रहणाचे पाणी...
जिल्ह्यातील एकूण ११८ गावे आणि वाड्यांनी अधिग्रहणासाठी १६२ प्रस्ताव दाखल केले होते. पंचायत समितीच्या पाहणीनंतर ४ गावांचे ११ प्रस्ताव रद्द करण्यात आले. ८९ गावांचे १०३ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी २५ गावांना २८ अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
आठ गावांची टँकरची मागणी...
जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, टाका, अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी, फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा आणि लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर या आठ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला. त्यापैकी एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मध्यम प्रकल्पांत १५ दलघमी पाणी...
जिल्ह्यात एकूण आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तावरजा, व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. त्यामुळे तिथे उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. उर्वरित पाच मध्यम प्रकल्पांत १५.१५३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात रेणापूर - २.४५१, देवर्जन - १.७३९, साकोळ - २.४७०, घरणी - ३.९७७ आणि मसलगा प्रकल्पात ४.५१६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.
सर्वाधिक साठा निलंगा प्रकल्पात...
प्रकल्प - उपयुक्त पाणी (%)
रेणापूर - ११.९२
देवर्जन - १६.२८
साकोळ - २२.५६
घरणी - १७.७०
मसलगा - ३३.२१
एकूण - १२.४०