HSC Exam: लातूर जिल्ह्यात पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला पाच कॉपीबहाद्दरांवर कारवाई
By संदीप शिंदे | Published: February 21, 2024 06:57 PM2024-02-21T18:57:06+5:302024-02-21T18:57:31+5:30
लातूर जिल्ह्यात पाच ठिकाणी कॉपीबहाद्दरांवर केलेली कारवाई कोणत्या ठिकाणी झाली याचीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या लेखी परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ९५ परीक्षा केंद्रावर सकाळी ११ ते २ या वेळेत ३७ हजारांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने पाच कॉपीबहाद्दरांवर भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.
लातूर विभागीय मंडळाकडे बारावी परीक्षेसाठी २० हजार ९४३ मुले तर १६ हजार ४०८ मुली अशा एकूण ३७ हजार ३५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यानुसार बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर जिल्ह्यातील ९५ परीक्षा केंद्रावर बुधवारी पार पडला. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी ३५ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, या पथकाने विविध केंद्रांना भेटी दिल्या. या पथकास पाच ठिकाणी कॉपी प्रकरणे आढळून आली. त्यानुसार त्यांनी कारवाई केली आहे. दरम्यान, लातूरातील दयानंद महाविद्यालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी परीक्षार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तसेच लातूर तालुक्यातील चिंचोली ब. येथील परीक्षा केंद्रांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी भेट देऊन माहिती घेतली. जिल्ह्यात पाच ठिकाणी कॉपी केसेस वगळता इतर सर्व केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पुप्ष देऊन स्वागत...
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दयानंद कला महाविद्यालयाच्या केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी तणावाखाली परीक्षा देऊ नये. दोन वर्षात मेहनत घेतलेली असते, त्यामुळे तुम्हाला ही परीक्षा कठीण जाणार नाही. तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असेही त्या म्हणाल्या. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, केंद्र प्रमुख अनिलकुमार माळी, डॉ. दिलीप नागरगोजे आदी उपस्थित होते.
विद्यार्थी उपस्थितीची माहितीच उपलब्ध नाही...
बारावीच्या पहिल्याच पेपरला किती विद्यार्थी उपस्थित, अनुपस्थिती होते याबाबत लातूर विभागीय मंडळ, शिक्षण विभागाकडे आकडेवारी सायंकाळपर्यंत उपलब्ध झाली नव्हती. दरम्यान, लातूर जिल्ह्यात पाच ठिकाणी कॉपीबहाद्दरांवर केलेली कारवाई कोणत्या ठिकाणी झाली याचीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.