HSC Result 2024: लातूर विभागाचा ९२.३६ टक्के निकाल, यंदा दोन टक्क्यांची वाढ
By संदीप शिंदे | Published: May 21, 2024 01:11 PM2024-05-21T13:11:17+5:302024-05-21T13:21:46+5:30
लातूर विभागीय मंडळाचा मागील वर्षी बारावीचा निकाल ९०.३७ टक्के लागला होता. यंदा त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली
लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून, लातूर विभागाचा ९२.३६ टक्के निकाल लागला आहे. मागील वर्षी ९०.३७ टक्के निकाल होता. यंदा त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, लातूर विभागात नांदेड ९१.११, धाराशिव ९१.१७ तर लातूर जिल्ह्याचा ९४.३० टक्के निकाल लागला असून, विभागात लातूर जिल्हा अव्वल ठरला आहे.
लातूर विभागात बारावी परीक्षेसाठी ९२ हजार ९३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ९१ हजार ५२८ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यात १२ हजार १६९ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ३५ हजार ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ३१ हजार ५०९ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ५८०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ८४ हजार ५४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा ९२.३६ टक्के निकाल लागला आहे.
लातूर विभागात विज्ञान शाखेतून ५० हजार ६६५ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. यात ४९ हजार २२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा ९७.८१ टक्के निकाल लागला आहे. तर कला शाखेतून ३० हजार १४३ विद्यार्थ्यांपैकी २४ हजार ६७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, कला शाखेचा निकाल ८४.१० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत लातूर विभागातील ८३६५ विद्यार्थी नोंदणीकृत होते. यात ७ हजार ६४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, वाणिज्य शाखेचा ९२.३१ टक्के निकाल लागला आहे. तसेच एचएससी व्होकेशनलचे ३३१९ पैकी २६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ८३.४९ टक्के निकाल लागला असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली आहे.
दोन टक्क्यांनी निकाल वाढला...
लातूर विभागीय मंडळाचा मागील वर्षी बारावीचा निकाल ९०.३७ टक्के लागला होता. यंदा त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली असून, ९२.३६ टक्केे निकाल लागला आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळात लातूर सातव्या क्रमांकावर असून, कोकण विभाग अव्वल आहे. लातूर विभागात ९१ हजार ५२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ८४ हजार ५४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९२.३६ टक्के निकाल लागला आहे.