HSC Result : लातूर विभागीय मंडळाचा ९९.६५ टक्के निकाल; ७७६४६ विद्यार्थी झाले उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 05:42 PM2021-08-03T17:42:44+5:302021-08-03T17:45:20+5:30
HSC Result Latur Board : कोरोनामुळे यावर्षी लेखी परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारेच विद्यार्थ्यांचे गुणांकन करण्यात आले.
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुल्यांकनाद्वारे बारावी बाेर्ड परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९९.६५ टक्के लागला आहे. नांदेड ९९.७३, उस्मानाबाद ९९.३७ तर लातूर जिल्ह्याचा ९९.६९ टक्के निकाल लागला आहे.
कोरोनामुळे यावर्षी लेखी परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारेच विद्यार्थ्यांचे गुणांकन करण्यात आले. लातूर विभागीय मंडळात नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील ३२ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ३२ हजार ५०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या १४ हजार २१ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर लातूर जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या ३१ हजार ३०२ विद्यार्थ्यांपैकी ३१ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची टक्केवारी ९९.६६ टक्के तर मुलांची टक्केवारी ९९.६४ टक्के आहे.
विज्ञान शाखेतील ३४ हजार ७६२ विद्यार्थी उत्तीर्ण...
लातूर मंडळांतर्गत विज्ञान शाखेतील ३४ हजार ७६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये नांदेड १५ हजार ५४, उस्मानाबाद ५ हजार ९०२ तर लातूर जिल्ह्यातील १३ हजार ८०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत २८ हजार १०७, वाणिज्य शाखेत १० हजार ७०९ तर किमान कौशल्यावर अधारित अभ्यासक्रमाचे लातूर मंडळातील ४ हजार ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक...
बारावी बोर्ड परीक्षेत लातूर मंडळात वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक ९९.९७ टक्के लागला आहे. कला शाखा ९९.८० टक्के तर विज्ञान शाखेचा ९९.४७ टक्के आणि किमान कौशल्यावर अधारित शाखेचा ९९.३४ टक्के निकाल लागला असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे सचिव सुधाकर तेलंग यांनी सांगितले.