HSC Result: विभागीय मंडळात लातूर जिल्हा अव्वल; विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 06:27 PM2022-06-08T18:27:53+5:302022-06-08T18:28:16+5:30
विज्ञान ९८.५४, कला ९३.४१ तर वाणिज्य ९६.५ टक्के निकाल
लातूर : बारावीच्या परीक्षेत लातूर विभागीय मंडळातून लातूर जिल्ह्याच्या विज्ञान शाखेचा निकाल ९८.५४, कला ९३.४१, वाणिज्य ९६.५ तर एचएससी व्होकेशनल ९३.३ टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत लातूर जिल्हा विभागात अव्वल क्रमांकावर राहिला आहे.
लातूर जिल्ह्यातून विज्ञान शाखेला १६ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १६ हजार ७५० प्रविष्ट झाले. त्यात १६ हजार ५०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९८.५४ टक्के एवढा आहे. कला शाखेसाठी ११ हजार ३५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ११ हजार ४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यात १० हजार ३२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या शाखेचा निकाल ९३.४१ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेसाठी ४ हजार ९८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ४९४५ प्रविष्ट झाले. त्यात ४७५० उत्तीर्ण झाले असून, या शाखेच्या निकालाची टक्केवारी ९६.५ अशी आहे. एचएससी व्होकेशनल विभागासाठी २३४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी २२२४ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यात २०६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एचएससी व्होकेशनल विभागाच्या निकालाची टक्केवारी ९३.३ अशी आहे. .
विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी...
लातूर विभागीय मंडळाअंतर्गत बारावीच्या परीक्षेस बसलेल्या ८८ हजार ८३० विद्यार्थ्यांपैकी १८ हजार १७२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, प्रथम श्रेणीत ४१ हजार ५१०, द्वितीय श्रेणीत २३ हजार २२२ तर १७११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
३८ विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द...
लातूर विभागीय मंडळाअंतर्गत २१२ मूळ केंद्र व ५५३ उपकेंद्र असे एकूण ७६५ केंद्र मुक्रर करण्यात आले होते. या परीक्षेत केंद्रावर २५ तर उत्तरपत्रिकेत खाडाखोड करणे १३ असे एकूण ३८ गैरप्रकार आढळून आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची त्या-त्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली असल्याचे विभागीय सचिव सुधाकर तेलंग म्हणाले.