HSC Result : लातूर विभागीय मंडळाचा निकाल ८९.७९ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 02:16 PM2020-07-16T14:16:22+5:302020-07-16T14:18:05+5:30
बारावी निकाल : यंदाच्या कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी बाहेर पडता आले नाही.
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेस मंडळातून ८६ हजार ५८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५ हजार ५६९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ७६ हजार ८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, लातूर विभागीय मंडळाची टक्केवारी ८९.७९ आली आहे़ मात्र, यंदाच्या कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी बाहेर पडता आले नाही.
लातूर विभागीय मंडळातंर्गत असलेल्या नांदेड जिल्ह्यातून ३६ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३१ हजार ९९९ उत्तीर्ण झाले. या जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८७.९४ एवढी आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यातून १५ हजार १०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी १३ हजार २७२ उत्तीर्ण झाले. या जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८७.८६ अशी आहे़ तर लातूर जिल्ह्यातून ३४ हजार ७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३१ हजार ५६१ उत्तीर्ण झाले. लातूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९२.६१ वर पोहचली आहे़ विभागीय मंडळात लातूर जिल्हा निकालात अव्वल स्थानावर आला आहे. त्यापाठोपाठ नांदेड व उस्मानाबादचा क्रमांक लागतो.