दोनदा प्रचंड मताधिक्य, यंदा 'चारीमुंड्या चीत'; लातूरचा पराभव भाजपला चिंतन करायला लावणारा
By हणमंत गायकवाड | Published: June 6, 2024 12:38 PM2024-06-06T12:38:11+5:302024-06-06T12:39:52+5:30
लातूर लोकसभेच्या विजयाने कॉँग्रेसमध्ये नवचैतन्य आले आहे
लातूर : मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने प्रचंड मताधिक्य मिळवत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या जिल्ह्यात पाय घट्ट रोवले होते. त्याही आधीचा इतिहास काँग्रेसचे मताधिक्य कमी-कमी होत आल्याचे होते. त्या परंपरेला छेद देत २०२४ ची लढाई जिंकत काँग्रेसने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. मात्र गेल्या दशकात वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये विजयाची घोडदौड करणाऱ्या भाजपला चिंतन करायला लावले आहे. आता लोकसभेच्या निकालाचा परिणाम येणाऱ्या विधानसभेत कसा होतो, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
२०१९ मध्ये भाजपने पावणेतीन लाखांचे मताधिक्य मिळविले; मात्र त्यावेळी विधानसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील सहापैकी दोन ठिकाणी काँग्रेस, दोन राष्ट्रवादी, एक शेकाप आणि भाजपला एकमेव जागा मिळाली होती, म्हणजेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची गणिते वेगळी होती, हे त्यावेळीही स्पष्ट झाले. परिणामी, याच वर्षात होणाऱ्या विधानसभेलाही प्रत्येक मतदारसंघात वेगळे चित्र असू शकते. लातूर शहर आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला एकत्रितपणे ४७ हजार ९२ मतांची आघाडी मिळाली. माजी मंत्री आ. अमित देशमुख व आ. धीरज देशमुख यांची मतदारसंघावरील पकड मजबूत झाली. परिणामी, भाजपला विधानसभेसाठी या दोन मतदारसंघांत अधिकची तयारी करावी लागेल. त्याचवेळी लोकसभेच्या निकालावर काँग्रेसला निवांत राहता येणार नाही. भाजपकडून उमेदवार कसे दिले जातात, त्यावरून लढत ठरेल. निलंग्यामध्ये काँग्रेसला २० हजार २१७ मतांची आघाडी मिळाली. त्यावरून काँग्रेस गोटात आनंद असला, तरी हीच स्थिती विधानसभेला राहणार नाही. तिथे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे आव्हान असेल, हे भान ठेवूनच रणनीती आखावी लागेल.
उदगीरमध्ये क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी जनसंपर्क आणि कामाच्या बळावर मतदारसंघ बांधला आहे. तिथे लोकसभा अटीतटीची झाली. निकालात मताधिक्य काठावर आले. त्यामुळे मंत्री बनसोडे आणि अहमदपूरचे आ. बाबासाहेब पाटील यांच्यासह सर्वच आमदार विधानसभा परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.