'हम भी कुछ कम नही', दिव्यांगावर मात करीत धावले खेळाडू !
By संदीप शिंदे | Published: December 21, 2022 05:33 PM2022-12-21T17:33:46+5:302022-12-21T17:34:12+5:30
जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा; बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जि. प. समाजकल्याण विभाग तसेच दिव्यांग पुर्नवसन केंद्र व दिव्यांगांच्या विशेष शाळांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा स्पर्धा पार पडल्या.
लातूर : न्यूनगंड बाजूला ठेवत जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याचे उत्तम सादरीकरण करत मैदान मारले. दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत हिररीने सहभाग घेऊन हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. या स्पर्धेत जिल्ह्यातील ४३ शाळांतील ६३४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जि. प. समाजकल्याण विभाग तसेच दिव्यांग पुर्नवसन केंद्र व दिव्यांगांच्या विशेष शाळांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. उद्घाटन सीईओ अभिनव गोयल यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी शामसुंदर देव, जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, पोलिस निरीक्षक गफार शेख, रामानूज रांदड, डॉ. राजेश पाटील यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील मूकबधिर,मतिमंद,अंध,अस्थिव्यंग व बहुविकलांग अशा पाच प्रवर्गातील ४३ शाळांमधील ६३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
८२ क्रीडा प्रकारात रंगले सामने...
या स्पर्धेत मैदानी खेळातील धावणे,गोळाफेक,सॉफ्टबॉल थ्रो, लांब उडी यासह विविध क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा घेण्यात आल्या. खेळाडूंनीही आपले व्यंग बाजूला सोडून क्रीडा कौशल्य पणाला लावले. यशस्वीतेसाठी समाजकल्याण विभागातील राजू गायकवाड, बाळासाहेब वाकडे यांच्यासह क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून बाळासाहेब चाकुरकर, प्रकाश आयरेकर, समाधान बुर्गे, दैवशाला जगदाळे, निशिकांत सदाफुले, रवींद्र गुडे, धनंजय नागरगोजे, बाळकृष्ण देवडे, गंगासागर आचार्य, सुजित माळी आदींनी परिश्रम घेतले.
विजेत्यांचा पुरस्काराने गौरव...
क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना मुख्य वित्त व लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, ज्येष्ठ पंच बाळासाहेब चाकुरकर यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. यात बहुविकलांग प्रवर्गात संवेदना सेरेबल पाल्सी विकसन केंद्र या संघाने सांघिक विजेतेपद पटकाविले.
या शाळांना मिळाले पारितोषिक...
अस्थिव्यंग प्रवर्गात सुआश्रय निवासी अपंग विद्यालय,इंदिरा गांधी निवासी अपंग विद्यालय मादलापूर,मतिमंद प्रवर्गात संत गाडगेबाबा बालगृह लातूर,मतिमंद विद्यालय लातूर,अंध प्रवर्गात शासकीय अंध शाळा लातूर,गंगाबाई बोरुळे अंध विद्यालय निलंगा,तर मूकबधिर प्रवर्गात सुशीलादेवी देशमुख मूकबधिर विद्यालय व ॲड. विजय गोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालयाने अनुक्रमे विजेतेपद व उपविजेतेपद पटकाविले.