माणुसकी लोप पावत आहे ! अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी नागरिकांनी टेम्पोतील शीतपेय हातोहात लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 05:26 PM2018-05-05T17:26:30+5:302018-05-05T17:26:30+5:30
शीतपेयांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका मालट्रकचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीनजिक घडली़ यावेळी अपघातग्रस्त टेम्पोतील शीतपेयांच्या बाटल्या व अन्य साहित्य नागरिकांनी हातोहात लांबविले़
चाकूर ( लातूर ) : शीतपेयांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका मालट्रकचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीनजिक घडली़ यावेळी अपघातग्रस्त टेम्पोतील शीतपेयांच्या बाटल्या व अन्य साहित्य नागरिकांनी हातोहात लांबविले़. मदतीला धावून जाण्याऐवजी नागरिक शीतपेयांचे बॉक्स पळविण्यासाठी धावाधाव करीत असल्याने माणुसकी कशी लोप पावत चालली, याचाच यावेळी प्रत्यय आला.
सोलापूर येथून शीतपेय घेऊन चाकूरकडे येणारा टेंम्पो ( एमएम १३ एएक्स ९२९८) हा नांदगाव पाटी नजीक आला तेव्हा समोरून चाकूरकडून लातूरकडे जाणारी मालट्रक ( एमपी २० एबी ५४८५) यांच्यात धडक झाली. टेम्पोचे मागचे टायर फूटून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे़ हा अपघात होताच टेंम्पोतील शीतपेय व रंगाच्या डब्ब्याचा सडाच रस्त्यावर पडला.
रस्ता रंगून गेला
अपघाताची माहिती मिळताच या परिसरातील व रस्त्यावरील लोकांनी शीतपेयाचे कार्टून उचलून घेण्यासाठी एकच गर्दी केली. परिणामी, काही वेळेसाठी वाहतूकीची कोंडी झाली. शीतपेयांच्या बाटल्याबरोबरच रंगाचे डब्बे ही नागरिकांनी उचलून नेले. टेम्पो पलटल्याने त्यातील साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले. यातच रंगाचे डबे फुटल्याने संपूर्ण रस्ताच रंगला होता. अपघातात टेम्पो आणि मालट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून टेम्पोचा चालक जखमी झाला आहे. याबाबत चाकूर पोलिस ठाण्यात सायंकाळपर्यंत कोणतीही तक्रार देण्यात आली नव्हती़
अशी वाढली धावपऴ़
अपघातानंतर टेम्पोतील शीतपेय रस्त्यावर पडले़ टेम्पातून शीतपेयांचे बॉक्स खाली पडल्याचे पाहून मदतीसाठी धावून जाण्याऐवजी अनेक नागरिकांनी बॉक्स उचलून पळविण्याचा सपाटा लावला़ बघता बघता संपूर्ण टेम्पो रिकामा झाला़ यात रस्त्याने निघालेल्या अनेक वाहनधारकांनीही हात धुवून घेतला़ अपघातानंतर मदत करण्याऐवजी नागरिक साहित्य घेऊन पळाले़ एकजण जखमी झाल्याने त्याची फारसी चर्चा झाली नाही़ मात्र, साहित्य पळविण्यासाठी नागरिकांची वाढलेली धावपळ पाहून सुजाण नागरिकांनी लोकांच्या वृत्तीवर सवाल उपस्थित केला आहे़