प्रत्येक महामारीवर मानवाची मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:48+5:302021-04-26T04:17:48+5:30
उदगीर येथील कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय व मराठवाडा इतिहास परिषद (औरंगाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४०व्या ऑनलाइन राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ...
उदगीर येथील कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय व मराठवाडा इतिहास परिषद (औरंगाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४०व्या ऑनलाइन राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ऐतिहासिक काळातील रोगराई, कारणे व उपाय योजना या विषयावर डॉ.लहाने बोलत होते. ते म्हणाले, आतापर्यंत प्लेग, स्पॅनिश फ्लू, कॉलरा व स्वाइन फ्लू या महामारीने करोडो लोकांचे बळी घेतले. त्यावर अनेक संशोधन झाले, सुधारणा झाल्या. मात्र, जी जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला हवी, त्यात आपण कमी पडलो, असे डॉ.लहाने म्हणाले.
सध्या आपण सर्वजण कोरोना महामारीचा सामना करीत आहोत. हा आजार झाल्यानंतर बेड मिळत नाही, ऑक्सिजन नाही, औषधे मिळत नाहीत, हे दृश्य आपण सर्वजण अनुभवत आहोत, पाहतो आहोत, याचे आपण साक्षीदार आहोत.
हा आजार होऊ नये, म्हणून आपण काय करतो, याकडे आपण सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. आजार झाल्यानंतर उपचार करणे हे कठीण आहे, पण आजार झालाच नाही पाहिजे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. हे विसरून चालणार नाही. मास्क वापरणे, बाहेर न फिरणे, हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. थोड्या प्रमाणात या आजाराची लक्षणे आल्यास स्वतःला किंवा कुटुंबातील इतर माणसांना विलगीकरण करून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून या आजाराचा संसर्ग वाढणार नाही.
अध्यक्षस्थानी मृदुलाताई पाटील होत्या. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.ओ.एम. क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक रेखा लोणीकर यांनी तर एस.जी. मोरे यांनी आभार मानले.
सामाजिक बांधिलकी जोपासा...
आजच्या कठीण स्थितीत विलगीकरण, दूर राहणे अनिवार्य आहे, पण दुरावा करू नका. संपर्कात राहा. रुग्ण व नातेवाइकांना धीर द्या, असे सांगून डॉ. लहाने यांनी रुग्ण, नातेवाईक यांच्यासाठी सदैव उपलब्ध असल्याचे सांगितले. उपचार जितके महत्त्वाचे, तितका मानसिक आधार मोलाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.