हाळी हंडरगुळीचा बाजार बहरला; बैलजोडीला लाखमोलाचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:21 AM2021-02-05T06:21:33+5:302021-02-05T06:21:33+5:30
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील जनावरांचा बाजार बहरला असून, बाजारात जनावरे विक्रीसाठी आणली जात आहेत. यंदा ...
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील जनावरांचा बाजार बहरला असून, बाजारात जनावरे विक्रीसाठी आणली जात आहेत. यंदा पावसाचे प्रमाण चांगले झाल्याने येथील बाजारात जनावरांचे भाव वधारले आहेत. उत्तम प्रतीच्या बैलजोडीला लाख रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळत आहे.
उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील बैलबाजाराला निजाम राजवटीत प्रारंभ झाला. या बाजाराला शतकाची परंपरा आहे. आजतागायत येथील बैलबाजार तग धरून आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार असा तीन दिवस हा बाजार भरतो. येथील बाजारात लाल कंधारी, देवणी, गावरान, संकरित आदी जातींचे पशुधन मिळत असल्याने महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश आदी राज्यांतील व्यापारी, शेतकरी, पशुपालक हाळी हंडरगुळी येथील जनावरांच्या बाजाराला पसंती देतात. दरवर्षी विजयादशमीनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी येथील बाजाराचा प्रारंभ हाेताे. एप्रिल मे महिन्यापर्यंत हा बाजार चालतो. यंदा कोरोनामुळे येथील जनावरांचा बाजार उशिरा सुरू करण्यात आला. त्यानंतर काही आठवडे जेमतेमच बाजार भरू लागला. मात्र सध्या बाजार बहरात आला असून, खरेदी-विक्रीसाठी गर्दी होत आहे. सद्य:स्थितीत चांगल्या बैलजोडीची किंमत लाखापेक्षा अधिक आहे. तर साधारण बैलजोडीसाठी ७० ते ८० हजार मोजावे लागत आहेत.
१ लाख ६० हजारांची बैलजाेडी...
उस्मानाबाद जिल्ह्यातील पुंडलिक पाटील या शेतकऱ्याने चाकूर तालुक्यातील एका शेतकऱ्याची बैलजोडी एक लाख साठ हजार रुपयांमध्ये रविवारच्या बाजारात खरेदी केली. बैलाबरोबरच गायी, म्हशी, शेळ्या या जनावरांची खरेदी-विक्री आता वाढली आहे.
बाजार परिसरात सुविधांचा अभाव...
हंडरगुळी ग्रामपंचायतीकडून बाजारात आणल्या जाणाऱ्या जनावरांवर व वाहनांवर कर आकारला जातो. मात्र सोयीसुविधांचा अभाव जैसे थे आहे. बाजारात स्वच्छतागृहांची सुविधा नाही. पिण्याचे पाणी नाही. निवासाची व्यवस्था नाही. त्यामुळे बाजारकरूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाजारात सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.