हंडरगुळीत चुरस वाढली; १५ जागांसाठी ३४ उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:30+5:302021-01-13T04:49:30+5:30
हंडरगुळी ग्रामपंचायतीला बाजाराचे चांगले उत्पन्न असल्याने येथील सरपंचास 'मिनी आमदार' या नावाने ओळखले जात असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. ...
हंडरगुळी ग्रामपंचायतीला बाजाराचे चांगले उत्पन्न असल्याने येथील सरपंचास 'मिनी आमदार' या नावाने ओळखले जात असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. हंडरगुळी ग्रामपंचायतीसाठी दुरंगी लढत होत असून, चार अपक्ष उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत.
गेल्या दशकापासून हंडरगुळी ग्रामपंचायतींवर अशोक धुप्पे यांची एकहाती सत्ता आहे. आता ते हॅट्ट्रिक साधण्यासाठी तयारीत आहेत; तर बालाजी पाटील यांनी त्यांना शह देण्यासाठी दंड थोपटले आहेत. दोन्ही पॅनलकडून प्रचाराची धूम सुरू आहे. अपक्ष उमेदवारही प्रचारासाठी सरसावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मतदारांना प्रत्यक्ष भेटून, स्पीकर, बॅनर, सोशल मीडिया या माध्यमातून मतदारांना चिन्हांची ओळख पटवून दिली जात आहे. आता शेवटी मतदार राजा कुणाच्या झोळीत मत टाकणार, हे आगामी काळात दिसून येईल.
या लढतीकडे लागले लक्ष
प्रभाग एकमधून बहुजन ग्रामविकास पॅनलकडून संतोष भोसले हे निवडणूक लढवीत असून त्यांच्यासमोर ग्रामपरिवर्तन पॅनलचे नागोराव चिमनदरे यांचे आव्हान आहे. शिवाय श्रीमंतअप्पा कोरे व शिवाजी माने या अपक्षांचीही लढत आहे; तर प्रभाग दाेनमधून ग्रामपरिवर्तन पॅनलचे प्रमुख बालाजी भोसले विरुद्ध बहुजन ग्रामविकास पॅनलचे विक्की भोसले यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे या लढतींकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.