रेल्वे बोगीचा कारखाना मी आणला; टिकोजीरावांनी भूमिपूजन केले, सरकारला घरचा अहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 06:03 AM2018-06-29T06:03:05+5:302018-06-29T06:03:17+5:30
महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना आणण्यासाठी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून मी प्रयत्न केले. या कारखान्यात स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी भरती परीक्षा लातुरात झाली पाहिजे
लातूर : महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना आणण्यासाठी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून मी प्रयत्न केले. या कारखान्यात स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी भरती परीक्षा लातुरात झाली पाहिजे, ही अटही आपण टाकली, मात्र ऐनवेळी श्रेय लाटणाऱ्या टिकोजीरावांनी भूमिपूजन उरकले, अशी खरमरीत टीका करीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी सरकारला घरचा अहेर दिला.
मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा थेट नामोल्लेख टाळून उद्योगमंत्र्यांनी भूमिपूजन करणाºयांना टिकोजीराव म्हणत मित्र पक्ष भाजपवर परखड टीका केली. लातूर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते म्हणाले, बोगी निर्मितीचा कारखाना लातूरला व्हावा. तो परराज्यात जाऊ नये, यासाठी आपण त्यावेळी बोललो नाही. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीच मंत्रिपद सोडण्यापूर्वी महाराष्ट्रात होत असलेल्या लातूरच्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. उद्योग विभागाच्या अधीन असलेली जागा आपण तत्पर उपलब्ध करून दिली. तसेच शिवसेनेच्या भूमिकेमुळेच स्थानिकांना या प्रकल्पात रोजगार मिळेल. कोणी काहीही सांगत असले तरी भरती प्रक्रिया रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्राच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून होईल, असेही देसाई म्हणाले.
यावेळी खा. चंद्रकांत खैरे म्हणाले, महाराष्ट्रात १५५ पेक्षा अधिक जागा मिळवून भगवा फडकावयाचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी शेवटच्या माणसांपर्यंत जावे. शेतकºयांच्या कर्जासाठी जे अधिकारी सहकार्य करणार नाहीत, त्यांना शिवसेना स्टाईलने सरळ वठणीवर आणा, असेही ते म्हणाले.
१५ लाख कसले; १५ चिंचोकेही नाही..!
प्रत्येक वर्षी दोन कोटी लोकांना रोजगाराचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात गेल्या चार वर्षांत एका अहवालानुसार २६ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ म्हणाले. तिथे आज कवडीमोल भाव मिळत आहे. भाजप नेत्यांना सत्ता म्हणजे जादूची कांडी वाटली आणि ते आश्वासन देत सुटले. खात्यावर १५ लाख टाकायला निघाले होते, आता १५ चिंचोकेही नाहीत. - सुभाष देसाई, उद्योगमंत्री